इतकी भयानक वाटत नाही. कौटुंबिक वितुष्टांची ही प्रकरणे स्त्रीचळवळीच्या विषयपत्रिकेवर असणे कितपत योग्य आहे? आत्महत्या असो, खून असो, शारीरिक छळाचा प्रश्न असो ; ही सारी कृत्ये गुन्हेगारीची आहेत. दंडविधानात त्यासंबंधी यथायोग्य तरतुदी आहेत. असल्या प्रकरणात जाणकार तज्ज्ञांनी बारकाईने तपास करणे महत्त्वाचे असते. असले तपास हे काही हौशागवशा कार्यकर्त्यांचे काम नव्हे. बळी पडलेल्या स्त्रीचा कोणी एक जिव्हाळ्याचा माणूस आग्रहाने आणि निश्चयाने पुढे सरसावला तर पोलिसी तपास ढिला पडणे कठीण होते. माहेरची माणसे बळी स्त्रीला न्याय मिळवून देण्याकरिता पुढे सरसावली तर महिला संघटनांना असल्या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज राहणार नाही.
खरे म्हणजे, असल्या प्रकरणांत महिला आंदोलनांचा काही संबंध नाही. स्त्रीवर जुलूम, अन्याय करणारे केवळ पुरुषच असतात असे नाही; बहुसंख्य प्रकरणी एका बाजूस सून तर दुसऱ्या बाजूस सासू आणि नणंद इत्यादि ठाकलेले असतात. सून ही स्त्री खरी, पण सासू आणि नणंद याही स्त्रियाच. वयाबरोबर सासू पुरुषसमाजात सामील होते आणि तेथे सत्तेचे स्थान मिळविण्यासाठी सुनेचा छळ करण्यात हातभार लावते असा एक अर्धाकच्चा सिद्धांत काहीजणांनी मांडला आहे. पण, हे नणंदेच्या बाबतीत तरी लागू नाही. पुष्कळदा नणंद ही भावजयीपेक्षाही वयाने कमी असते, विवाहित असल्यास तिलाही संसाराचे काही चटके सोसावे लागलेले असतात. थोडक्यात, असली प्रकरणे म्हणजे स्त्रीजातीवर इतरेजनांनी केलेला अत्याचार असे निखळपणे नसतेच आणि तरीही असल्या घरगुती प्रकरणांत महिला संघटना उत्साहाने लक्ष घालतात आणि आपली ताकद खच्ची करून घेतात.
स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या महिला संघटना इतरही पोलिसी थाटाचे प्रश्न हाती घेतात. बलात्कार, पोलिसी अत्याचार असे कुटुंबाबाहेरील गुन्हे घरगुती वितुष्टांइतकेच थकविणारे असतात.
सेवाभावी संस्था
नवऱ्याने टाकून दिलेल्या, विधवा, कुमारी माता, अपंग स्त्रिया यांच्याकरिता शिक्षणाची सोय करणे, त्यांना काही आरोग्यसेवा देणे, त्यांच्या चरितार्थासाठी काही उद्योगधंद्यांची सोय करणे, त्यांना स्वावलंबी बनविणे अशा तऱ्हेची कामे करता येतात. पण, गुजरातेतील इला भट यांच्या 'सेवा'संस्थेसारखे काही अपवाद सोडले तर त्यांत फारसे यश मिळत नाही. अशा कामांना प्रचंड मेहनत, चिकाटी, व्यवस्थापनकौशल्य आणि व्यवसायबुद्धी यांची गरज असते.