पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थापतात.
 मोठमोठ्या मान्यवर महिला संघटनांत लब्धप्रतिष्ठित स्त्रियांनी महत्त्वाची सारी पदे अडविलेली असतात. कोणत्याही कार्यक्रमात मिरवायला त्यांनाच मिळते, नाव त्यांचेच होते. त्यामुळे अशा संस्थांत नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना आत शिरकायला फारसा वाव नसतो. अनेकदा होते असे की, महिला संघटनांतील स्त्रीचे स्थान तिच्या नवऱ्याच्या समाजातील प्रतिष्ठेवर आणि आर्थिक सुसंपन्नतेवर अवलंबून असते. म्हणजे तर, कर्तृत्वाने नाव मिळविण्याचा, काही करून दाखविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तेव्हा जी ती एक नवी पाटी लावून आपली एक संस्था उभी करू पाहते. एकेका शहरात दीडशेदोनशे महिलासंस्था आपापल्या नावांच्या पाट्या आणि नोंदणी क्रमांक मिरवीत उभ्या असतात.
 पोलिसी कामे
 अनेक घरांत नवराबायकोचे, सासूसुनेचे, नणंदाभावजयांचे पटत नाही; काही ठिकाणी या वितुष्टांना मोठे विक्राळ स्वरूप येते. काडीमोडाची वेळ येते, नवरा नांदवत नाही, बायको सासरी जात नाही, सून जीव देते किंवा सासरचे तिला मारून टाकतात अशी अनेक प्रकरणे प्रत्येक समाजात, हर वस्तीत, दररोज घडतच असतात. असे काही घडले की जवळपासच्या महिला संघटनांतील काही बाया असल्या प्रकरणात लक्ष घालतात; नवविवाहित सुनेची बाजू न्याय्य आहे असे गृहीत धरून कामाला लागतात. पोलिसांत तक्रार नोंदवतात, मोर्चे काढतात, निदर्शने करतात. काही वेळा थोडेफार यश मिळते, बहुधा हाती फारसे काही लागतच नाही. अशा प्रकरणांचा पाठपुरावा करायचा म्हणजे मोठी ताकद, साधने, संयम आणि धैर्य लागते. एक प्रकरण निकालात निघण्याआधी दहा नवी प्रकरणे उभी राहतात. अगदी उत्साही, तळमळीच्या कार्यकर्त्यांचीही दमछाक होऊन जाते. एखाद्या प्रकरणात थोडी चूक झाली तर महिला कार्यकर्त्यांवरही दोषारोप होऊ लागतात. त्यांचा उत्साह मावळू लागतो. कार्यकर्तीच्या घरात किंवा जवळच्या नातेवाईकांतच असे वितुष्टाचे एखादे प्रकरण उभे राहिले म्हणजे मग या साऱ्याच खटाटोपाच्या फोलपणाची जाणीव होऊ लागते.

 नववधूंना आणि सुनांना होणारा जाच आणि छळ ही एक गंभीर समस्या आहे. भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर नववधू जीव देतात की, त्यांची कोणाही सुसंस्कृत समाजाला शरम वाटावी. पतिनिधनानंतर त्याच्या चितेवर स्वत:ला जाळून घेण्यास शोकाकुल विधवा तयार होतात याचे लोकांना आश्चर्य वाटते; पण, नवविवाहित मुली स्वत:ला जाळून घेण्यास तयार होतात ही गोष्ट

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४१