पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली. पैशाबरोबर आलेल्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपोटी बायकांचे घराबाहेर पडणे बंद झाले, घरात बसून रोट्या भाजण्याचेच काम त्यांच्याकडे राहिले. थोडक्यात, आर्थिक प्रगतीबरोबर स्त्रियांची पीछेहाट झाली. मग, या प्रश्नावर स्त्री-चळवळीने भूमिका घेतली पाहिजे. सर्वसाधारण विकासामुळे लोकसंख्येत निम्म्या असलेल्या स्त्रियांची पीछेहाट होत असेल तर तो विकास नव्हेच अशी मांडणी करणे, विकासाची पर्यायी संकल्पना मांडणे हे स्त्री चळवळीचे काम आहे.
 सर्वसाधारण प्रगतीचा विपरीत परिणाम होत नाही, पण त्याचा लाभ पूर्णांशाने स्त्रियांपर्यंत पोहोचत नाही असे विषय असू शकतात. गावोगाव शाळा उघडल्या गेल्या, दवाखाने उघडले गेले; पण, या सगळ्या सुविधांचा लाभ स्त्रिया बरोबरीच्या हक्काने उठवू शकत नसल्या, तर असे का होते? स्त्रियांना अशा सुविधांचा पुरेपूर फायदा कसा घेता येईल? या सुविधा देण्याची पद्धतच मुळात बदलली पाहिजे का? हे सारे विषय महिला चळवळीचे विषय आहेत.
 बाईचा दृष्टिकोन हा सर्वसाधारण दृष्टिकोनापेक्षा वेगळा असू शकतो. त्या दृष्टीने, स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन करावयाचे असेल, आत्मपरीक्षण करावयाचे असेल तर ते दोन पातळ्यांवर झाले पाहिजे सर्वसाधारण नागरिकांच्या पातळीवर झाले पाहिजे आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनही झाले पाहिजे.


 २. महिला आंदोलनाची दुर्दशा
 मंडळे उदंड माजली

 जागोजागी भगिनीमंडळे, वनिता समाज, स्त्री-संघर्ष समित्या उगवतात आणि स्त्री-साहाय्याची काही जुजबी कामे करीत राहतात. स्वधर्मीयांकरिता, स्वजातीयांकरिता काही उपयोगी कामे करणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे असे समजून लोक संस्था उभ्या करतात. जन्माच्या अपघाताने त्या जातीत किंवा धर्मात आपण जन्मलो त्याचा अभिमान तो काय बाळगायचा? आणि आपल्या बुद्धीचा, कर्तबगारीचा आणि त्यागाचा लाभ एका मर्यादित समाजापुरताच संकुचित का ठेवायचा? हा प्रश्न अनेकांना पडतही नाही. निसर्गधर्माने ते आपल्या जन्मदात्या समाजाचा अभिमान बाळगतात आणि त्यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काहीतरी किडमिड कामे करीत राहतात. बहुतेक स्त्रीसंस्था आणि स्त्रीनेत्या यांची परिस्थिती अशीच आहे. स्त्रीजन्माला आलो आणि स्त्रीपुरुष संमिश्र समाजात आपल्या कर्तबगारीला पुरेसा वाव नाही अशी जाणीव झाली की स्त्रिया महिला चळवळीकडे वळतात; एखादा समाज, मंडळ किंवा समिती

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४०