पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही तर केव्हाही देशाच्या प्रगतीचे अवलोकन करण्यास स्वभावत:च असमर्थ आहे.
 एक आशेचा किरण
 शेतकरी महिला आघाडीकडून या बाबतीत काही आशा करण्यास जागा आहे काय ? स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पुरी झाली त्याबरोबर चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनानंतर पुरी अकरा वर्षे उलटून गेली. शेतकरी महिला आघाडीने काय कमावले? काय गमावले? याचा ताळेबंद स्वातंत्र्याच्या ताळेबंदाबरोबर मांडला गेला तर त्यातून काही नवी जाण, नवी दिशा मिळू शकेल. शेतकरी महिला आघाडी दुहेरी समुद्रमंथनाचे हे आव्हान पेलू शकेल काय? सांगणे कठीण आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे. शेतकरी महिला आघाडीस हे आह्वान पेलले नाही तर दुसऱ्या कोणास हे शिवधनुष्य उचलण्याची हिम्मत होण्याचा काहीच संभव नाही.
 शेतकरी महिला आघाडीचा आजपर्यंतचा इतिहास आणि विचार थोडी आशा दाखवितो. महिला चळवळीचे क्षेत्र काय? याची सुस्पष्ट व्याख्या शेतकरी महिला आघाडीनेच फक्त दिली आहे. देशात समाजवाद असावा का खुल्या बाजारपेठेची व्यवस्था? आंतरराष्ट्रीय व्यापार खुला असावा का बंदिस्त? रुपया परिवर्तनीय असावा का नसावा? या असल्या विषयांवर मते बनविण्याचा आणि व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे - पुरुषांना तसेच स्त्रियांना. एखादी बाई या विषयांवर बोलते, मते व्यक्त करते तेव्हा ती स्त्री म्हणून बोलत नसते, एक नागरिक म्हणून बोलत असते. नागरिक म्हणून समान हक्काने हाताळावयाचे विषय हे स्त्री-चळवळीचे विषयच नाहीत. महिला आंदोलनाच्या व्यासपीठावर अशा सर्वसाधारण विषयांची चर्चा करणे म्हणजे चळवळीची ताकद, वेळ आणि साधने फुकट घालविण्यासारखे आहे. मग, स्त्री-चळवळीची विषयपत्रिका कोणती? शेतकरी महिला आघाडीच्या बेजिंगविरोधी परिषदेत याची सुस्पष्ट व्याख्या दिलेली आहे. देशाचा सर्वसाधारण विकास आणि स्त्रियांचा विकास यांत दिशेचा आणि गतीचा फरक जेथे जेथे आढळतो तो तो स्त्री-चळवळीचा जिव्हाळ्याचा विषय होतो. म्हणजे नेमके काय?
 स्त्री-आंदोलनाचे क्षेत्र

 देशाची प्रगती झाली, उत्पादन वाढले पण, त्याचा स्त्रियांना लाभ होण्याऐवजी जाच होऊ लागला तर स्त्री-चळवळीने या प्रकरणी लक्ष घातले पाहिजे. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या घरी पैसा आला पण, त्याबरोबर बाटलीबाईही

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३९