पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगवेगळे अभ्यास करीत आहेत, परिसंवाद भरवीत आहेत. यांच्यापैकी कोणालाही स्वातंत्र्यानंतरच्या काळाचे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अवलोकन करण्यासाठी एखादा परिसंवाद घ्यावा असे सुचले नाही? या विस्मरणाचे खरे कारण मोठे गंभीर आहे. या विषयावर स्त्रियांना म्हणून काही वेगळे मत असू शकेल हे मुळात महिला चळवळीतील कार्यकर्त्यांनासुद्धा सुचलेले नाही, उमगलेले नाही. देशाच्या प्रश्नात सगळ्यांचे जे मत तेच स्त्रियांचे, स्त्री-चळवळीची म्हणून काही वेगळी भूमिका असण्याचे काय कारण? देशाची प्रगती झाली असो का अधोगती, स्त्रियांना त्यांचा वाटा मिळाला की झाले ! साऱ्या स्त्रीचळवळीची बांधणी आणि धावपळ स्त्रियांना काही हिस्सा मिळावा, मुख्यतः बाईच्या दुःखाच्या कारणाने स्त्री-मुखंडींना सत्ता, साधने आणि अधिकार मिळावे या उद्देशाने होत आहे. देशात अंदाधुंदी माजली असली, भ्रष्टाचार बोकाळला असला, गुंडांचे साम्राज्य पसरले असले आणि न्यायालये तुंबली असली तरी स्त्रियांच्या संरक्षणाची मात्र व्यवस्था चोख असावी, निदान त्या निमित्ताने स्त्री-अधिकारी नेमल्या जाव्यात, सुरक्षिततेच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी स्त्रीमुखंडींना संवादपरिसंवाद करण्यासाठी साधनसंपत्ती मिळावी. सारे लोकतंत्र कोलमडून पडत असले तरी चालेल, स्त्री-पुढाऱ्यांना राखीव जागा मिळाव्यात. देशाचे आर्थिक दिवाळे का वाजो, स्त्रियांचा उत्पन्नातील आणि मालमत्तेतील वाटा कागदोपत्रीतरी ठरला पाहिजे. स्त्रीचळवळ अशी मर्यादित झाली आहे.
 अवघड जागी दुखणे

 पन्नास वर्षांचे अवलोकन हे हिंदुस्थानातील महिला चळवळीच्या दृष्टीने अवघड जागेतील दुखणे आहे. शहरी महिला चळवळ डावेपणाचा डौल मिरविणाऱ्या मुखंडीच्या हाती आहे. शासन हेच देशाच्या आणि महिलांच्या उद्धाराचे आणि प्रगतीचे साधन आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे. पन्नास वर्षांच्या अवलोकनाचा पहिला निष्कर्ष त्यांच्या दृष्टीने मोठा अडचणीचा निघतो. सरकारने जेथे जेथे हात घातला त्या त्या विषयाचे वाटोळे झाले हे आता बहुतांशी मान्य झाले आहे. पण, हे मान्य करणे म्हणजे शहरी स्त्रियांच्या डावखुऱ्या चळवळीचा पायाच उखडून टाकण्यासारखे आहे. स्त्रियांच्या उद्धाराचे कायदे सुचवावेत, प्रकल्प सुचवावेत हे ज्यांनी सदासर्वकाळ केले आणि शासनाच्या दरवाजाशी जे जे ताटकळत याचना करीत उभे राहात आले त्यांची यजमानाचेच दिवाळे वाजले आहे हे कबूल करण्यात मोठी कुचंबणा आहे. थोडक्यात, देशातील आम महिला चळवळ स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षीच

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३८