पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सात

१९९७ च्या अधिवेशनांपुढील कामगिरी




 १. दुहेरी आत्मपरीक्षण
 आत्मपरीक्षणातील गळबटपणा
 स्वातंत्र्याचे पन्नासावे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने चहूकडे, पन्नास वर्षांत काय घडले? पन्नास वर्षांपूर्वी कोठे होतो? कोठे जायला निघालो होतो? कोठे येऊन पोहोचलो आहोत? दिवसेंदिवस प्रवास सुकर होण्याऐवजी खडतरच होत आहे, असे का? आपण वाट चुकलो तर नाही? योग्य वाटेला पुन्हा लागायचे कसे? या प्रश्नांची देशभर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात हे प्रश्न काही गंभीरपणे चर्चेला घेतले जात नाहीत. उत्सवप्रियतेमुळे स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा जल्लोश साजरा करण्याची संधी आम्ही सोडत नाही. पण, खरे म्हटले तर गंभीरपणे आत्मचिंतन करण्याच्या कार्यक्रमाला कोठे सुरुवातही झालेली दिसत नाही.
 बाईला काहीच म्हणायचे नाही?
 देशातील सर्व नागरिकांनी इतक्या गंभीर विषयाबाबत इतका गळबटपणा स्वीकारला. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून गेल्या पन्नास वर्षांतल्या वाटचालीची पाहणी करण्याची कल्पनाही कोणाच्या मनाला सुचलेली नाही. मी मी म्हणणाऱ्या महिला अग्रणींनीही स्त्रियांनी एकत्र बसून स्वातंत्र्यानंतरच्या काळातील घडामोडींबद्दल काही वेगळा अभ्यास करावा असे सुचविलेले नाही. स्वातंत्र्यानंतर काय कमावले, काय गमावले ? या प्रश्नावर स्त्रियांचा म्हणून काही वेगळा दृष्टिकोन असू शकतो असे कोणालाच वाटले नाही. हे काय विस्मरणाने घडले? ही साधी चूकभूल आहे काय? कामांच्या सगळ्या गर्दीत, धावपळीत स्त्रियांचा दृष्टिकोन पाहावा याची आठवण राहिली नाही काय?

 ही साधी चूकभूल नाही. यामागे जास्त गंभीर समस्या लपलेली आहे. देशभरात डझनावारी महिला संस्था पंचायत राज्यातील स्त्रियांच्या अधिकारांबद्दल

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३७