पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुक्ताईने केले ज्ञानेशा शहाणे



 निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई त्यांच्या आईबापांनी आत्मत्याग केल्यानंतर सर्व बाजूंनी अनाथ झाले. ब्रह्मसमाजाचा छळवाद त्यांच्या आईबापांचा बळी घेऊन शमला नव्हता. एके दिवशी ज्ञानेश्वर भिक्षा मागण्यासाठी गावात गेले असता एक धर्ममार्तंडाने त्यांचा अपमान केला. पायाखालील धरणी दुभंगावी तसे ज्ञानेश्वरांना झाले. पाठीवरून हात फिरवायला दुसरे कोणीच नसल्यामुळे घराचा दरवाजा बंद करून तो स्थितप्रज्ञ ज्ञानेश धाय मोकलून रडू लागला आणि मग बराच वेळ अपमानाच्या दुःखाला उजाळा देत स्फुंदत राहिला. जेव्हा धाकटी बहीण मुक्ताबाई घरी आली आणि कधी नव्हे तो दरवाजा बंद पाहून तिला आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने हुंदक्यांचा पुसटसा आवाज आल्यावर काय झाले आहे ते त्या छोटुकलीने, केवळ भावाविषयीच्या प्रेमयोगाने, जाणले आणि तिने ज्ञानेश्वरांची, 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' अशी विनवणी सुरू केली. 'वैराग्य हा मोक्षाचा मार्ग नाही, नियतीने वाढून ठेवलेले कर्म निष्काम भावनेने करावे' असे तत्त्वज्ञान त्या चिमुरडीने ज्ञानेश्वरांना सांगितले तेव्हा ज्ञानेशांचे मन शांत झाले आणि त्यांनी दार उघडले.
 चांदवडसाठी तयारीची मंथनशिबिरे

 १९८६ साली, चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनाच्या आधी मी अशा मुक्ताया लाखोंनी जोडल्या. शेतकऱ्यांना घामाचे दाम हवे असेल तर घामाची मोजदाद होऊन ज्यांनी ज्यांनी घाम गाळला त्यांना त्या घामाच्या प्रमाणात दाम मिळाले पाहिजे. पहाटे कोंबडा आरवल्यापासून ते रात्री उशिरा कांबरुणाला पाठ लागेपर्यंत शेतकऱ्याघरची लक्ष्मी दररोज पंधरा ते सोळा तास कष्टत असते ; सकाळचे केरवारे, सारवण, पाणी भरणे, दळण, चूलपोतेरे, गोठ्यातील वैरणपाणी, साफसफाई अशी अनेक कामे. भाकरतुकडा झाल्यावर ती शेतावर जाते आणि सांजी झाल्यावर वाटेने काटक्याकुटक्या गोळा करीत

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३