पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःच्या धर्मव्यवस्थेसंबंधी विरोधी सूर काढणे म्हणजे द्रोहाचे महापापच ! आणि स्त्रियांची तशी हिम्मत होणे आज दुरापास्त आहे. जागतिक प्रकाशझोतात स्त्रीचळवळ, स्त्रिया फार लवकर ढकलल्या गेल्यामुळे त्यांच्यावर वर्षानुवर्षे जुलूम करणाऱ्यांचेच समर्थन करणे त्यांना भाग पडत आहे. बेजिंगला मोठे विचित्र दृश्य दिसले. स्त्रिया एकमेकींवर तुटून पडत होत्या. स्त्रियांचे हक्क बजावण्यासाठी नव्हे तर त्यांच्या आपापल्या धर्मांच्या व्यवस्था कशा सर्वश्रेष्ठ आहेत, स्त्रियांचा आदर करणाऱ्या आहेत आणि परिवर्तनीय आहेत हे हिरीरीने मांडण्याकरिता आणि त्या व्यवस्थामध्ये बाहेरून बदल घडवून आणण्याची काही आवश्यकता नाही हे सांगण्याकरिता.
 जागतिक परिषदा भरवण्याऐवजी प्रादेशिक किंवा धर्मनिहाय परिषदा बोलावल्या गेल्या असत्या तर स्त्रियांना कदाचित त्याचा जास्त फायदा झाला असता. ठरलेल्या नमुन्यात प्रत्येक परिषदेस त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील स्त्रियांच्या परिस्थितीविषयी निवेदन करण्यास सांगण्यात आले असते. त्यांमुळे, स्त्रियांविषयी आपली व्यवस्था उदार आहे असे निदान दाखवणे शासनाला किंवा धार्मिक नेत्यांना आवश्यक झाले असते. वेगवेगळ्या व्यवस्थात त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली असती. अणि त्याचा फायदा स्त्रियांना, विशेषतः स्त्रीपुरुष भेद, वंशवाद, गरिबी आणि धर्मवाद अशा बहुविध अन्यायांनी गांजलेल्या स्त्रियांना त्याचा काही फायदा झाला असता. आजच्या परिस्थितीत शासनांना स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेली वचने पुरी करण्याची काहीही आवश्यकता वाटत नाही. जसजशा नवीन परिषदा भरतील तसतशा जुन्या वचनांची अंमलबजावणी न करता ते नवीन वचने देण्यास तयार होतात. नैरोबी परिषदेत १९८५ साली 'दूरदर्शी रणनीती'ची घोषणा करण्यात आली. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. स्त्रियांविषयीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेला अजून नव्वदावर देशांनी मान्यता दिलेली नाही आणि तरीही एक नवी परिषद बेजिंग येथे भरवण्यात आली. कारण अशा जागतिक परिषदांमुळे नोकरशाहीस आपले फायदे वाढवण्याकरिता स्त्रियांचा उपयोग करता येतो. परिषदांचे स्वरूप अधिक बांधीव असते तर त्यांना वाव मिळाला नसता.
 निष्कर्ष

 गैरसरकारी संस्थांच्या महिला बोलल्या त्या फक्त स्वतः पुरत्या. त्या इतर कोणाचेच प्रतिनिधित्व करत नव्हत्या. त्यातील बहुतेक डाव्या परंपरेतील आणि सरकारी नोकरशाही वाढावी आणि सरकारचा प्रभाव वाढावा यात स्वारस्य असलेल्या. त्यांनी जे घोषणापत्र तयार केले त्यात स्त्रीप्रश्नाची जाण कोठेच

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३५