पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघटनांच्या महिलांची स्वातंत्र्याबद्दलची प्रतिक्रिया पाहून आठवण होते पन्नास वर्षांपूर्वीची- चिनी स्त्रियांची पावले लहान आणि नाजूक दिसावीत म्हणून ती पट्ट्यांनी बांधून ठेवण्याची पद्धत होती. ती पद्धत बंद करण्याचे ठरले तेव्हा पाय बांधलेल्या स्त्रियांनीच पाय सोडण्याच्या कल्पनेस विरोध केला होता. बेजिंगी महिला आज नेमके तेच करीत आहेत.
 महत्त्वाची एक गोष्ट. स्त्रियांची आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील प्रगती सरकारच्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमुळे झाली ही कल्पनाच मुळात खोटी आहे. उदाहरणार्थ, हिंदुस्थानात स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या क्षेत्रात प्रगती झाली ती शासनाच्या प्रयत्नांमुळे झाली नसून शासनाच्या विरुद्ध प्रवाहात जाऊन झालेली आहे. अन्नधान्याची स्वयंपूर्णता हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाने झाली, आयुष्यमान वाढले ते औषोधोपचारांच्या बाबतीत घडून आलेल्या तांत्रिक क्रांतीमुळे आणि विशेषतः प्लेग, कॉलरा, देवी, क्षय यासारख्या साथीच्या रोगांवर तोडगे सापडल्यामुळे. लोकांची ज्ञानाची पातळी वाढली ती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ; जिल्हा परिषदांच्या शाळांमुळे फक्त शाळेत दाखल झाल्याची आकडेवारी फुगली! तंत्रज्ञानानेच मनुष्यजातीला सरकारशाहीच्या विद्ध्वंसापासून वाचवले आहे.
 आर्थिक क्षेत्रातून सरकारची सत्ता कमी करणे याचा अर्थ सामाजिक किंवा कल्याणकारी कार्यक्रम सर्वतोपरी बंद करणे असा होत नाही. कल्याणकारी कार्यक्रम अजून कित्येक वर्षे चालूच राहतील. पण ती सरकारी नियंत्रणाखाली नाही तर अशा तऱ्हेचे कार्यक्रम चालवण्यात विशेष स्वारस्य आणि जाणकारी असलेल्या संस्थांच्या अधिपत्याखाली. उदाहरणार्थ, हिंदुस्थानातील गरिबी हटवायचा सर्वोत्तम कार्यक्रम गुरुद्वारांतील ‘लंगर' हा आहे. सरकारशाही व्यवस्थांमध्ये सर्व सत्ता राजकीय सरकारांच्या हाती एकवटण्याचा प्रयत्न होतो. स्वतंत्रतावादी लोकशाही व्यवस्थेत सत्तेचे केंद्र एकवटलेले नसते, तर मनुष्याच्या बुद्धीतील वेगवेगळ्या पैलूंप्रमाणे स्वतंत्र सार्वभौम सत्ताकेंद्रांची एकमोठी प्रभावळ उभी असते - संरक्षण, स्पर्धात्मक अर्थव्यवस्था, अपंगांसाठी उदार मदत, खुली प्रसारमध्यमे, ज्ञानाच्या स्वायत्त संस्था आणि अनिर्बंध कला इत्यादी इत्यादी.

 अशा व्यवस्थेविषयी भीती कोणाला वाटते ? जी माणसे समाजाला जितके देतात त्यापेक्षा समाजाकडून कमी घेतात त्यांना सरकारशाहीच्या विसर्जनाबद्दल चिंता वाटत नाही. याउलट, समाजाच्या कष्टावर पोसणाऱ्या बांडगुळांना मात्र स्वातंत्र्याच्या अरुणोदयाबद्दल मोठी चिंता वाटते.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३२