पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रत्यक्षामध्ये जीवशास्त्रीय परिस्थिती अशी नाही. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये समानता अधिक, फरक कमी आणि जो फरक आहे तो गुणांचा नसून अंशाचा. स्त्री-पुरुष म्हणजे निव्वळ काळे-पांढरे असे नाही. बहुतेक स्त्री-पुरुष काळे आणि पांढरे यांच्या वेगवेगळ्या छटा घेऊन जन्माला येतात आणि जगतात. श्रमविभागणी करताना काळे-पांढरे पद्धत न वापरता अंशात्मक पद्धती वापरली असती तर त्या श्रमविभागणीमुळे तयार झालेला असंतोष सीमित राहिला असता. उत्तर युरोपातील स्कॅण्डिनेव्हियन देशांतील अभ्यासावरून हे स्पष्ट होते की स्त्रियांप्रमाणेच अनेक पुरुषांनाही त्यांच्यावर लादल्या गेलेल्या भूमिकेच्या कचाट्यातून सुटण्याची इच्छा आहे; निर्णय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर पुरुष आणि स्त्रिया दोघेही आपापल्या विशेष प्रकृतिमानानुसार, आवडीनिवडीनुसार आपापल्या कुटुंबाची रचना आणि दोघांच्याही आवडीनिवडी लक्षात घेणारी श्रमविभागणी करतील आणि ती अशी लवचिक आणि बदलती ठेवतील की त्याचा जाच कोणालाच वाटू नये. सध्याची पुरुषप्राधान्याची कुटुंबव्यवस्था बदलून जाईल आणि विविध रंगाछटांची संसारातील भागीदारांच्या आवडीनिवडी लक्षात घेणारी आणि त्यांच्या इच्छाआकांक्षांना वाव देणाऱ्या कुटुंबपद्धतीची मालिका बहरून येईल. ही अशी उत्क्रांती कार्यक्षमतेचा आग्रह धरणाऱ्या व्यवस्थेतच होऊ शकेल. थोडक्यात, पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था फक्त खुल्या व्यवस्थेतच विकास पावू शकते आणि या खुल्या व्यवस्थेचाच बेजिंगी मुखंडींना मोठा राग आहे.
 खुलीकरणामुळे स्त्री-मुक्ती साध्य भली होत असेल, पण त्यामुळे गैरसरकारी संघटनांच्या मुखंडींच्या सर्व सुखाचे वाटोळे होते त्याचे काय? त्यामुळेच बेजिंग येथे जमलेल्या गैरसरकारी संघटनांच्या महिलांनी चंग बांधला आणि अशा काही मागण्या केल्या की, मामला इतका गंभीर नसता तर त्या हसण्यावारीच नेता आल्या असत्या. स्त्रिया मागासलेल्या आहेत, त्यांचे मागसलेपण प्रामुख्याने आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या क्षेत्रात आहे. या क्षेत्रात त्यांचे सक्षमीकरण येन केन प्रकारेण घडवून आणण्याचा त्यांनी घाट घातला. प्रस्थापित सत्तेची सर्व केंद्रे विसर्जनाच्या वाटेवर आहेत, सक्षमीकरणाच्या व्याख्याच बदलत आहेत याचे त्यांना भान नाही.
 स्त्रियांच्या कामाचे मोजमाप

 बेजिंगी मुखंडींनी सर्व सरकारांकडे पहिली मागणी केली- ज्या कामाकरिता स्त्रियांना रोजगार मिळत नाही त्या कामाचेही मोजमाप आणि मूल्यमापन राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबात झाले पाहिजे. आता कोणत्याही घरकाम करणाऱ्या स्त्रीच्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १२६