पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा इतर व्यसने नाहीत त्या घरात मिळणाऱ्या मालमत्तेतील उपभोगाचे प्रमाण इतके काही विषम नसते.
 शेवटी एक प्रश्न राहतोच. स्त्री-पुरुष आणि त्यांचा संसार हा समाजाचा मूलभूत घटक आहे असे मानले तर तो घटक फोडून त्यातील स्त्री व पुरुष वेगवेगळे आहे असे मानून त्यांची तुलना करण्याच्या प्रयत्नांत कितपत अर्थ आहे?
 मुद्दा आहे स्वातंत्र्याच्या कक्षांचा
 थोडक्यात, सर्वसाधारण स्त्रियांच्या आयुष्याची गुणवत्ता ही ज्यांच्या त्यांच्या पुरुषांच्या तुलनेने कमी प्रतीची आहे हे नाकारता येणार नाही. पण, दोघांतील फरक मिळकत, मालमत्ता, सत्ता या मापदंडांनी मोजायला गेले तर अशास्त्रीय गृहीततत्त्वे मान्य करावी लागतात. यासाठी एक प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेली चाचणी करण्यात आली. स्त्रिया व पुरुष यांच्या गटांना दोन प्रश्न विचारण्यात आले. पुन्हा जन्म घेण्याची संधी मिळाली तर त्यांना पुरुष होणे आवडेल का स्त्री? आणि दुसरा प्रश्न, किती मिळकत, मालमत्ता किंवा सत्ता दिल्यास आपला निर्णय बदलण्यास ते तयार होतील? प्रश्न विचारलेल्या जवळजवळ सर्वांनीच त्यांना पुरुष-जन्म घेणे आवडेल असे सांगितले. एवढेच नव्हे तर मिळकत, मालमत्ता किंवा सत्ता यांचा कितीही वर्षाव झाला तरी स्त्रीजन्म घेण्याची त्यांची तयारी दिसली नाही. निष्कर्ष असा की साहाय्य कार्यक्रमाने वापरलेले मापदंड हे कुचकामी आहेत.
 स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यातील गुणवत्तेचा फरक संपत्तीचा नाही आणि सत्तेचाही नाही. फरक आहे तो स्वातंत्र्याच्या कक्षांचा. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात निवड करण्याच्या संधी कमी वेळा मिळतात, निवड करण्याची संधी मिळते तेव्हा समोर येणाऱ्या विकल्पांची संख्या कमी असते आणि या विकल्पांचे क्षेत्र पुरुषांच्या तुलनेने अधिक मर्यादित असते. स्त्रियांना गरज आहे ती निवडीच्या स्वातंत्र्याची किंवा स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याची. स्वातंत्र्याची सत्ता, मत्ता इ. बाह्य आणि जुजबी लक्षणे महत्त्वाची नाहीत. स्त्रियांना स्वातंत्र्य हवे आहे, जास्त ऐसपैस सोनेरी पिंजरा ही त्यांची महत्त्वाकांक्षा नाही.

 स्त्री-पुरुष भेदावर आधारलेली श्रमविभागणी म्हणजे स्त्री आणि पुरुष हे अगदीच दोन वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांच्यात समान काहीच नाही, जो स्त्री असतो तो पुरुष नसतो आणि जो पुरुष असतो तो स्त्री नसतो अशा गृहीततत्त्वावर आधारलेली आहे.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १२५