पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून काही निष्कर्ष मांडले. ते निष्कर्ष गणिती पद्धतीने थोडक्यात असे मांडता येतील.


 HDI - Human Development Index - मानवी विकास निर्देशांक - माविनि
 GDI - Gender Development Index- नारी विकास निर्देशांक - नाविनि
 GEM - Gender Empowerment Measure- नारी सक्षमीकरण निर्देशांक - नासानि

माविनि नाविनी नासनि इ.इ.

 या आकडेवारीचा खटाटोप करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या साहाय्य कार्यक्रमाने अक्षरश: डोंगर पोखरून उंदीर काढला आहे. अहवालाचा निष्कर्ष किरकोळ आहे. एवढेच नव्हे तर, अगदी अडाणी माणसालासुद्धा माहीत असलेला असा आहे.
 महिला शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतील त्यांचे मागासलेपण संपवीत आहे. या उलट, इतर सर्व क्षेत्रांत आजही अगदी सुधारलेल्या देशांतही, पुरुषांच्या तुलनेने त्या मागासलेल्या आहेत. या निष्कर्षाबद्दल काहीच वाद नाही. हे निष्कर्ष ज्या पद्धतीने काढण्यात आले ती पद्धत मात्र मान्य होण्यासारखी नाही. ही अशास्त्रीयता चुकीने, निरागसपणे घुसलेली नाही. ही पद्धत बेजिंगमध्ये जमलेल्या साथीदारांच्या स्वार्थाच्या सोयीसोयीने काढण्यात आली.
 दोन वेगवेगळ्या जीवनपद्धतींच्या गटांची तुलना करताना ती दोघांपैकी एकाच गटाला लागू असलेल्या मापदंडांनी करण्यात आली. साहाय्य कार्यक्रमाच्या मापदंडांत मातृत्वाचा आनंद, घरामधील सुरक्षा इत्यादि बाबी लक्षात घेतल्या गेल्या असत्या तर पुरुषांचा पुढारलेपणा बराच कमी दिसला असता.

 दोन्ही गटांच्या जीवनशैलीस योग्य अशी सर्व गमके आणि मापदंड यांची सर्वंकष यादी तयार झाली तरीसुद्धा एक प्रश्न राहतोच. सत्ता, मिळकत, मालमत्ता यांचे महत्त्व किती आणि मातृत्व, बाजारपेठेपासून अलिप्त राहण्याचे भाग्य यांचे महत्त्व किती? शंभर रुपये मिळकत बरोबर किती वर्षांचे वाढते आयुष्यमान ? हे कोणी ठरवायचे? हे ठरवण्यात थोडी जरी चूक झाली किंवा फरक झाला तर निघणारे निष्कर्ष अगदी वेगळे होऊ शकतात. बेजिंगच्या घोषणापत्रात एक वाक्य असे आहे - आम्ही स्त्रिया जगातील दोन तृतीयांश काम करतो पण आमची मिळकत मात्र पाच टक्केसुद्धा नाही.' अशाच तऱ्हेचे एक विधान नैरोबी परिषदेच्या वेळेसही करण्यात आले होते आणि साहाय्य कार्यक्रमाच्या अहवालातही असेच काही गृहीत धरलेले आहे. या विषयावर काही अनौपचारिक अभ्यास करण्यात आला आणि त्यावरून असे दिसले की ज्या घरात दारू

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १२४