पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्यक्रम निरर्थक किंवा अनभ्यस्त आहेत याचा आढावा इतरत्र घेण्यात आला आहे. पण या दस्तावेजात काही नव्या आकर्षक कल्पनांचे कणबिंदूही आहेत.
 महिलांच्या दृष्टिकोनातून स्वच्छता, पाणीपुरवठा, इंधन या प्रश्नांना प्राधान्य देणे (४:८), अंगणवाडी व शाळा यांची जोड लावून मुलींना आपल्या धाकट्या भावंडास सांभाळता सांभाळता अभ्यासक्रम पुरा करता यावा (१५:४), कायम स्वरूपी नोकरी स्त्रियांवर अन्याय करणारी असल्यामुळे त्याज्य ठरवणे (९:४:१), शहरी रोजगार हमी योजना (९:६:१३) यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील विकासाच्या धाटणीमुळे गावांतील निवासी शिक्षक ही संस्था संपुष्टात आली. निवासी शिक्षक-शिक्षिकांमुळे दुसऱ्या गावांतील शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलींच्या शिक्षणाची थोडीफार सोय होत असे. जीवन विद्या/शिक्षण मंदिरांमुळे शिक्षक कामापुरता गावात येऊ लागला. गावातला शिक्षक इतरत्र शाळेत जात असल्याने गावच्या मुलामुलींच्या शिक्षणाशी त्याचा संबंध तुटला. स्त्रीशिक्षणाच्या दृष्टीने हा मोठा आघात झाला. गावांतील शिक्षक निवासी असले पाहिजेत. अशीही सूचना या धोरणात केली असती तर परिच्छेद (९:४:२), (९:४:३), (९:४:४) च्या भूमिकेस धरून झाले असते.
 अनाहूत विनोद
 या धोरणात काही अनाहूत आणि अहेतुक विनोद घडले आहेत. पहिल्या नमनालाच, प्रस्तावनेत 'महाराष्ट्रातील काही ज्ञात आणि असंख्य अज्ञात स्त्रियांनी ज्यांनी नेहमीच बाजूला राहून आगेकूच करण्याची संधी दिली' त्यांचा उल्लेक आहे. म्हणजे सर्व स्त्रियांचा मागासलेपणा स्त्रियांनी आपणहून पुरुषांना वाव देण्याकरिता स्वीकारला आहे अशी उपपत्ती लावल्यानंतर साऱ्या मजकुराचे काही प्रयोजन राहत नाही. याखेरीज, मानसिक समता (३:१), आत्मिक फुलोरा (६:१) असे शब्दप्रयोग आहेत. शहरी स्त्री आर्थिक बाबतीत 'अधिक आक्रमक' असल्याचे सांगितले आहे म्हणजे काय ते लेखक जाणे.
 शहरीकरणाच्या स्त्रियांवर होणाऱ्या परिणामाविषयी विस्ताराने उल्लेख आहे (६:३) आणि हे शहरीकरण औद्योगिकीकरण आणि दळणवळण यंत्रणेची वाढ यांच्यामुळे झाले आहे असे म्हटले आहे. स्त्रियांवरील विपरीत परिणाम शहरीकरणामुळे झालेले नसून असंतुलित विकासामुळे उद्भवलेल्या बकालीकरणामुळे आहे याचा कबुलीजबात दस्तावेजात नाही, याचे कारण समजणे कठीण नाही.
 दारू दुकानबंदीचे रामायण

 महाराष्ट्र राज्यात अंतुल्यांच्या काळापासून पुढाऱ्यांना दारूच्या दुकानांचे

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ११२