पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतंत्रपणे तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी याकरिता कोणत्याही सरकारी धोरणाशिवाय व कायद्याशिवाय स्त्रीला स्वातंत्र्य मिळावे याचा प्रयत्न समाजप्रबोधनातून करण्यात आला. यात जात-नोकरी, शिक्षित-अशिक्षित, कुशल-अकुशल, गृहिणी-कामकाजी असे भेद न पाडता सरसकट स्त्रियांचा विचार करून निकोप समाज घडविण्याचा प्रयत्न या साहित्यात आहे.
 खुली अर्थव्यवस्था येणार यात स्त्रीचे स्थान काय असेल हा प्रश्न भले ही भल्याभल्या विदुषींना पडला असेल; पण शेतकरी महिला आघाडीपुढे हा प्रश्न निर्माण झाला नाही. याचे कारण तिची शास्त्रशुद्ध वैचारिक मांडणी आहे. शेतकरी महिला आपले स्थान खुल्या अर्थव्यवस्थेत दुय्यम न होता स्वतंत्रपणे निर्माण करण्याच्या निर्णयाला येऊन कामाला लागली.
 मात्र बेजिंग परिषदेतील ठरावामुळे पुन्हा तिला अग्निपरीक्षेकरिता उभे राहावे लागत आहे. बेजिंग परिषदेतील ठराव म्हणजे समग्र महिला चळवळ सरकारी दावणीला बांधण्याचा प्रयोग म्हंटला तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे 'बेजिंग परिषदेचा अर्थ व इशारा' यातून स्पष्ट होते. स्त्रीस्वातंत्र्याच्या लढ्यात राजकीय हस्तक्षेपाने प्रगती होईल हे स्वप्न चळवळीत अगदी प्रसिद्ध असलेल्या महिला कार्यकर्त्याने बघावे याच्यासारखे दुसरे दुर्दैव महिला चळवळीच्या नशिबी दुसरे असूच शकत नाही. स्त्री-पुरुष यांच्यात असलेली दुय्यमत्वाची दरी स्त्रियांच्या 'मंडलीकरणा'ने, स्त्रीपुरुषांच्या घरकामाच्या वाटणीने व समान श्रमविभागणीतून कायद्याच्या एका फटक्यात संपणार नाही, तसेच तिच्या घरकामाचा मोबदला आकारून सुटणार नाही. शे.म.आ. च्या साहित्यातून आ. शरद जोशींनी जो समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखविला आहे तो अधिक भरवशाचा वाटतो. हे केवळ पुस्तकातच लिहिले नाही तर शे.म.आ. ने आपल्या वेगवेगळ्या आंदोलनांतून व कामांतून सिद्ध करून दाखविले आहे.

 जागतिक परिषदेतील ठराव, (काही नोंदी वगळता) आयोगाचे कार्य हे (वरवर) स्त्रियांना न्याय मिळवून देणारे जरी वाटत असले तरीही ते एक "मृगजळ" आहे यात शंका नाही. अनेक कायदे स्त्रीच्या विकास व न्यायाकरिता केले गेले पण त्यांची अंमलबजावणी नाहीच पण खुल्लमखुल्ला पायमल्ली होताना आपण बघत आहोत. समाजात स्त्रीला स्थान मिळावे याकरिता मलमपट्टीचा खटाटोप उदंड जाहला. आता वेळ वास्तविकतेकडे वळण्याची गरज आहे. समाज निर्माण करण्याची क्षमता असलेल्या स्त्रीकरिता समाजात बरोबरीचे स्थान मागावे लागत आहे आणि तेही सरकारी मदतीने हे महिला चळवळीला शोभनीय नाही. समाजबदलाच्या प्रक्रियेत समाजाचा विस्फोट न होता बदल होणे महत्त्वाचे

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १०