पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याकडे वाटचाल चालू झालेली आहे. सुरक्षाव्यवस्था अजून अनेक वर्षे शासकीयच राहील. शिक्षण, आरोग्य यासंबंधी योजना आणि प्रकल्प बराच काळ शासनाकडे राहण्याची शक्यता आहे. याउलट, उत्पादन, व्यापार आदि विकासयोजनांतून शासन आपले अंग काढून घेत आहे. पंतप्रधानांच्या अनेक निवेदनांतून मध्यममार्गाची ही कल्पना स्पष्ट झाली आहे. ज्या वेळी केंद्र शासन विकासाच्या जबाबदारीतून मोकळे होऊन कल्याणकारी क्षेत्रापुरते मर्यादित होऊ पाहात आहे, नेमके त्याच वेळी महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण कल्याणकारी दृष्टिकोन सोडून अधिक व्यापक विकासाची जबाबदारी स्वीकारू पाहात आहे, कलम (२:३). केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वयाच्या अभावाचे हे उदाहरण मानावे लागेल किंवा महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण करताना ना सिद्धांताचा, ना प्रचलित संदर्भाचा गंभीर विचार झाला असे मानावे लागेल.
 महिलांच्या विकासाची परागती
 महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण सर्वसाधारण विकास अनेकदा स्त्रियांपर्यंत पोचत नाही हे मान्य करते (३:२); पण स्वातंत्र्योत्तर काळातील अनुभव सांगतो की काही तथाकथित विकासाचा स्त्रियांवर विपरीत किंवा दुष्ट परिणाम होतो. उत्पन्न वाढल्यावर दारूचे व इतर व्यसनांचे प्रमाण वाढणे, घरची स्थिती सुधारल्यावर बाहेर कामावर जाणाऱ्या स्त्रीस पुन्हा एकदा घर, चूल व मूल आणि अनेकदा पडदा यांत अडकवून घ्यावे लागणे, यांत्रिकीकरणामुळे सुलभ झालेली कामे स्त्रियांकडून पुरुषांकडे जाणे आणि जड कंटाळवाणी कामे स्त्रियांकडे येणे, शहरांच्या बकालीकरणामुळे स्त्रियांच्या मुक्त हालचालींवर बंधने येणे ही सर्वसाधारण विकास आणि स्त्रियांचा विकास यांच्यातील व्यस्त प्रमाणाची उदाहरणे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरणामध्ये या वास्तविकतेची थोडीशीही जाणीव दिसत नाही. महिला धोरणाचा जो मुख्य विषय त्याविषयीच धोरणाच्या लेखकांचे असे अज्ञान आहे.
 शहरी नोकरदार महिलांचा दृष्टिकोन

 स्त्रीचळवळीच्या सुरुवातीच्या कालखंडात चळवळीचे ध्येयधोरण, कार्यक्रम यांवर डाव्या चळवळीचा फार मोठा पगडा होता. मार्क्सवादी विचारातील वर्गविग्रह आणि वर्ग संघर्ष यांना समांतर अशा 'स्त्री विरुद्ध पुरुष' संघर्षाची मांडणी सर्रास होत असे. आता हा दृष्टिकोन फारसा मानला जात नाही. स्त्रीपुरुष यांच्यातील संबंध अर्थकारणातील संबंधांइतके बटबटीत आणि ढोबळ नाहीत, त्यांत अनेक बारकावे आहेत. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या पुरुषांप्रमाणेच आई, पत्नी, मुलगी, बहीण यांच्याकरिता सर्वस्वाचा होम करणाऱ्या पुरुषांचीही

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १०५