पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपण घामाचे दाम मागतो. पण घरच्या लक्ष्मीच्या घामाची किंमत करत नाही. शेतकऱ्यांना इतर नागरिकांप्रमाचे सन्मानाने जगायला मिळाले पाहिजे असे म्हणतो पण घरातल्या लक्ष्मीला गुलामासारखे वागवतो. अशा खोटेपणाला यश कसे लाभेल? कापसाचा भाव मागायचा आणि राजीवस्त्रे घालून मिरवायचे अशासारखाच हा खोटेपणा झाला. घरच्या लक्ष्मीचा मान राखला नाही तर बाहेरची लक्ष्मी घरात यायची कशी? आणि आली तरी टिकायची कशी?
 लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम म्हणजे काय हे आता स्पष्ट होऊ लागले असेल. घरच्या लक्ष्मीच्या कर्जातून मुक्त होण्याचा हा कार्यक्रम आहे. या एवढ्या लाखालाखांच्या कर्जातून मुक्त व्हायचे कसे? आणि कोणत्या जन्मी? देवाच्या देण्यातून आपण कसे मोकळे होतो ? तो आपल्याला हवा देतो, पाणी देतो, अन्न देतो, आकाश देतो, धरती देतो. त्याच्या ऋणातून आपण कसे मोकळे होतो? तोंडात घास टाकण्याआधी त्याला आपण नैवेद्य दाखवतो. म्हणतो बाबा हे सगळं तुझ्यामुळे आहे. झटकन देवाचं देणं फिटतं.
 लक्ष्मीमुक्ती हा कार्यक्रम असा नैवेद्याचा आहे. शेतकरी त्याच्या लक्ष्मीला म्हणतो, "बाई, माझ्या गरिबाच्या संसारात तू हळदीच्या पावलांनी आलीस. तुझी काहीच हौस मौज घरात झाली नाही. आल्यागेल्या पै-पाहुण्याचं तू काही कमी पडू दिलं नाहीस. मी तुला वेडेवाकडे बोललो. काही वेळा हातही उगारला. तुझ्या सगळ्या कष्टांची आणि त्यागाची आज मी कृतज्ञतापूर्वक आठवण करतो आणि या एवढ्याशा जमिनीच्या तुकड्याचा तुला नैवेद्य दाखवतो."
 लक्ष्मीमुक्ती करणारे गाव कोठेही असो- आडवाटेला असो, दऱ्याखोऱ्यांत असो, डोंगरकपारीत असो, जंगलात असो वा वैराण माळमाथ्यावर असो तेथे जाण्याचे मी का मान्य केले हे आता तुम्हाला समजले असेल.
 लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमांत सहभागी झालेल्या या लक्षावधी शेतकऱ्यांनी काय केलं थोडक्यात सांगू?
 रामाला जे धनुष्य पेलले नाही ते धनुष्य या बहाद्दरांनी उचलून दाखवले म्हणून हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी मी तुमच्या गावात आलो.
 भूमिकन्या सीतेला जे भाग्य लाभले नाही ते लक्ष्मीमुक्तीच्या प्रत्येक गावातील शंभरेक मायबहिणींना लाभले त्याचा आनंदसोहळा पाहण्यासाठी मी गावागावांत आनंदाने फिरतो आहे.

(शेतकरी संघटक, २१ फेब्रुवारी १९९२)

■ ■

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १०३