पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांच्या कामाची रोजीच झाली रु. २ लाख १० हजार. तिला मिळालं काय, अंगावर कापड आणि पोटातली भाकर. सोसयटीचं देणं एवढं थकलं असतं तर आज थकबाकी निघाली असती किती? रुपये आठ लाखाच्या वर.
 हिंदू समाजात दोन प्रकारच्या देव-देवता मानतात. मंगल देवता आणि ओंगळ देवता. मंगल देव म्हणजे विष्णू, कृष्णासारखे. त्यांना प्रसन्न केले तर ते भले करतात. पूजाअर्चा काही केली नाही तरी त्यांची काही तक्रार नसते. या उलट गावोगावचे म्हसोबा-खंडोबा या ओंगळ देवता. त्यांना जत्रेच्या दिवशी बैल दाखवला नाही की आटोपलाच कारभार. सगळी माणसं ओंगळ देवतांची मर्जी संपादायला धावतात. मंगल देवतांकडे कोणी लक्ष देत नाही.
 सोसायट्या, बँका हे सगळे ओंगळ सावकार. तगादे लावतात, जीप पाठवून भांडी उचलतात, कोर्टात जातात, जप्ती करवतात. त्यांची कर्ज फेडण्याकरता आपण जिवाचा आकांत करतो. घरची लक्ष्मी सावकार खरी. थोड्याथोडक्या रकमेची नव्इहे, चांगली ८-१० लाखाच्या कर्जाची. पण ती काहीच तगादा लावत नाही. उलट इतर सावकाराचं कर्ज भागवण्याकरता अंगावरचे दागिनेसुद्धा प्रसंगी उतरून देते. या मंगल सावकाराचं कर्ज फेडण्याचा विचार तुम्ही कधी करणार?
 या कर्जातून मुक्त होणं महत्त्वाचं आहे. हे काम अगदी निकडीचं आहे. हे कर्ज न फेडल्याच्या पापाची किंमत, आपल्याला मोठी जबरदस्त द्यावी लागली आहे हे लक्षात ठेवा.
 शेतीमालाच्या भावाच्या लढ्यासाठी १९८४ साली आपण गावबंदीचे हत्यार काढले. गावात जे कोणी उमेदवार निवडणूक प्रचाराकरता येतील त्यांना शेतीमालाच्या भावाबद्दल बोलायला लावायचे, नाहीतर गावबंदी करायची असे आपण ठरवले. प्रत्यक्षात काय झाले ? इंदिराबाईंची हत्या झाली आणि उमेदवार आले ते डोळ्यांतून पाणी काढत आले. सरकारी धोरणामुळे आपल्या पोराबाळांची दैना झाली हे मायबहिणी विसरून गेल्या. "बिच्याऱ्याची माय मेली त्याला मत द्या." म्हणून त्यांनी राजीव गांधींना प्रचंड मतानं विजयी केलं. गावबंदी अयशस्वी झाली.

 १९८९ मध्ये पुन्हा तेच घडलं. सीतामाईला वनवासात धाडणाऱ्या रामाच्या देवळाच्या बाजूनं मायबहिणी गेल्या. कर्जमुक्तीचे, शेतीमालाच्या भावाचे त्यांना काही अप्रूप वाटले नाही. त्यांचे काय चुकले? शेतीमालाला भाव मिळाल्यामुळे त्यांच्या वेठबिगारात काही फरक पडणार आहे अशी त्यांना काही आशाच वाटत नाही तर त्यांनी आपल्या आंदोलनाच्या बाजूने का नेटाने उभे राहावे?

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १०२