पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सोडवून घेण्याकरिता शेतकरी संघटनेसोबत पुढे सरसावली; आसखेड पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मुलांमुलींच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न, कुटुंबातील आपल्या स्थानाचा विचार, मुलीला कमी न लेखण्याचा निर्धार, आर्थिक लुटीचा विरोध करण्याच्या जागरुकतेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सत्तेत स्थान मिळवून घेण्याकरिता सिद्ध झाली.
 १९८९ मध्ये अमरावती अधिवेशनातील आयुध घेऊन शे.म.आ. पुढे सरसावली. गावातील गावगुंडाचे अड्डे नष्ट करण्याकरिता दारू दुकान बंदीचे पाऊल उचलले. जिल्ह्या-जिल्ह्यांत दारूची दुकाने बंद पाडून सरकारला कायदा करण्यास भाग पाडले. स्त्रियांना मालमत्तेत अधिकार असावा, ती परित्यक्ता व निराधार होऊ नये याकरिता समाजाचे मनपरिवर्तन करून 'लक्ष्मी मुक्ती'चा कार्यक्रम राबविला. कमी अधिक दोन लाख स्त्रियांच्या नावाने जमिनी करण्यात याव्या या आशयाचे अर्ज तालुक्यातालुक्यातील कार्यालयांत येऊन पडले. या जागृतीतून 'लक्ष्मी मुक्ती'चा अध्यादेश १९९४ साली काढण्यास महाराष्ट्र सरकारला भाग पडले. दहाबारा वर्षे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आंदोलनात्मक मार्गातून सरकारला घेण्यास भाग पाडले. चांदवडच्या ठरावानुसार १०० टक्के स्त्रिया उभ्या करण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण स्त्री ग्रामस्वराज्य आपल्याकरिता आहे या त्वेषाने निवडणूक लढली व १०० टक्के स्त्रिया निवडून येऊन येनोरा (जि. वर्धा), मेटीखेडा (जि. यवतमाळ), विटनेर (जि. जळगाव) अशा ठिकाणी ५ वर्षे यशस्वी कामकाज केल्याच्या नोंदी आहेत याचे विवेचन या स्त्रीसाहित्यातून मिळते.

 मजल दरमजल शेतकरी महिला आघाडीची सरशी होत आहे हे बघून स्त्रीमताच्या गठ्ठयाकडे लक्ष ठेवून शासनाने महिला धोरण व महिला आयोग निर्माण केले. हे आयोग व हे धोरण स्वतंत्रपणे व स्वबळावर स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला (आंदोलनाला) विचाराला खीळ घालण्याचे धोरण आहे हे "दळभद्री चिंधी" ने अभ्यासपूर्ण मांडणी करून स्पष्ट केलेले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात दारिद्रय, अनारोग्य, शिक्षणाच्या नावाने शंख, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, असुरक्षितता, शून्य आर्थिक विकास याचेच उत्तर सरकारला शोधता आले नाही, या सरकारच्या नाकर्तेपणावर कोणत्याही प्रकारे चर्चा न करता आसखेड पध्दतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भारत वैद्यकाचा अभ्यास करून आरोग्याचा प्रश्न सोडविण्याकरिता, गावात शिक्षण उद्योजकतेकडे नेणारे असावे याचा विचार करण्याकरिता व स्त्रीला

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ९