Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्माना प्रारब्ध म्हणतात. आणि क्रियमाण म्हणजे प्रत्यक्ष करीत असलेली कर्मे. तथापि 'क्रियमाण' हा प्रकार प्रारब्धात समाविष्ट होत असल्याने तो निराळा मानण्याची जरुरी नाही असे लोकमान्यानी म्हटले आहे. वेदांतसूत्रात प्रारब्ध कार्य व अनारब्ध कार्य असे कर्माचे दोनच प्रकार केले आहेत (वे.सू.४–१–१५) ते अधिक सयुक्तिक आहे. ज्ञानप्राप्तीने अनारब्ध कर्माचा क्षय होऊ शकतो पण प्रारब्ध कर्मे ही भोगूनच संपवावी लागतात, असा या दोहोत महत्वाचा फरक आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुषासही मरण येईपर्यंत प्रारब्ध कर्माचा क्षय होईतो थांबावे लागते. मीमांसकांनी मोक्ष मिळवण्यासाठी सोपा मार्ग काढला आहे. काम्प आणि निषिध्द कर्माचा त्याग केला म्हणजे मोक्ष मिळण्यास अडचण नाही. प्रारब्ध कर्मे उपभोगाने संपली की कर्मबंधातून सुटका होते. गीतेने या मताचे खंडन केले आहे, हे मागे तिसऱ्या प्रकरणात सांगितले आहे. कर्माची कटकट कायमची दूर करण्यासाठी व मोक्षप्राप्ती होण्यासाठी ज्ञान हा एकच मार्ग आहे. गीता म्हणते ‘ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।” " " (गीता ४.३७) अर्थ – ज्ञानरुपी अग्नीने सर्व कर्मे ज़ळून जातात. पण ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान नव्हे. "मानसिक ज्ञान प्रथम होऊन "इंद्रियांचा जय केल्यावर ब्रह्मीभूत होण्याची अवस्था” एवढा अर्थ विवक्षित आहे" (पृष्ठ २५५). कर्मबंधातून मुक्त होण्यास कर्मे सोडणे हा मार्ग नाही. ब्रहम आणि त्याचाच अंश असलेला आत्मा हे दोन्ही स्वतंत्र आहेत. त्यापैकी ब्रहम हे नेहमीच मुक्तावस्थेत असते पण आत्मा हा देहेंद्रियांच्या कोंडीत सापडलेला असतो. तरी तो मोक्षानुकूल कर्मे करण्याची प्रेरणा देतो. या प्रेरणेने मनुष्य वागू लागला म्हणजे अखेरीस त्यास आत्मज्ञान होते. माणसास आत्मस्वातंत्र्य असले तरी उन्नती करुन घेण्यास प्रयत्न करायला हवेतच. फ्रेंच पंडित कॉम्प्टच्या मतेहि "प्रयत्नाने मनुष्यास आपले वर्तन व परिस्थिती सुधारता येते ही गोष्ट त्याने प्रयत्न सिध्द म्हणून, उपपत्ती वाचूनच स्वीकारली आहे (पृष्ठ २५९) त्यासाठी बुध्दी शुध्द अथवा निर्मल असावी लागते व ती निर्मल होण्यास वैराग्याचा अभ्यास करावा लागतो. इंद्रिय निग्रहाची गरज असते. हे सारे साधण्यासाठी गीतेत पातंजल योग सांगितला आहे. गीता रहस्य : एक अध्ययन