Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिथ्या, क्षणभंगूर, वारंवार बदलणारी अत एव अनित्य आहे. या विचारासच शंकराचार्यानी 'नित्या - नित्य - विवेक' असे ठसठशीत नाव दिले आहे. येथे 'मिथ्या' या शब्दाची थोडी फोड केली पाहिजे. मिथ्या म्हणजे अजिबात खोटे, भासमान, बेगडी असा अर्थ नाही. सोन्याचा अलंकार घडवताना त्यात हीण मिसळावे लागते, मण्यात लाख भरावी लागते, नक्षीकाम असल्यास भरपूर मजूरी द्यावी लागते पण तो अलंकार मोडण्यासाठी जेव्हा सराफाकडे येतो तेव्हा सराफ त्यामध्ये शुध्द सोने किती आहे, हे पहातो. त्याची मजूरी वगैरे लक्षात घेत नाही. त्याच्या दृष्टीने सोने हे सत्य व अलंकार हा खोटा किंवा मिथ्या असतो. जीव व परब्रहम यांच्या ऐक्याचा विचार पुढे करण्यात येईल. नामरुपात्मक बाह्य सृष्टीला उपनिषदात 'माया' असे म्हटले आहे. नंतरच्या वेदांत ग्रंथात 'अविद्या' असा उल्लेख येतो. गीतेत माया, मोह, अज्ञान वगैरे शब्दानी हाच अर्थ सांगितला आहे. नामरुपात्मक सृष्टीचा पाश्चात्यानी सखोल अभ्यास करुन भौतिक शास्त्रात मोठाले शोध लावले आहेत. पण बाह्य सृष्टीचा कितीही अभ्यास केला तरी परतत्वाचे ज्ञान होत नाही. छांदोग्दोपनिषदात नारद सांगतो की "मी चार वेद, इतिहास पुराण, व्याकरण, गणित, तर्कशास्त्र, नीतीशास्त्र वगैरे शिकलो आहे, पण मला आत्मज्ञान झाले नाही." (छांदोग्य.अ. ७) या परतत्वाचे ज्ञान इंद्रियाना होत नाही. ते आत्म्याला होते. त्यामुळे त्याला 'ज्ञाता' (म्ह.जाणणारा) असे म्हटले आहे. जे जाणून घ्यावयाचे ते ज्ञेय होय. येथे परतत्व हे ज्ञेय आहे. ज्ञाताला ज्ञेयाचे जे स्वरुप समजते, त्याला ज्ञान असे म्हणतात. विज्ञानवादात ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान या तिन्ही पैकी पहिल्या दोन्हींचे अस्तित्व नाकारलेले आहे. त्यामुळे होणारे ज्ञान हेच महत्वाचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु वेदांत सूत्रात (वे. सू. २-२-२८ ते ३२) या मताचे खंडन केले आहे. येथे शांकर मतावर येणाऱ्या एक दोन आक्षेपांचे निराकरण केल्याशिवाय हा विचार स्पष्ट होणार नाही. शंकराचार्यांनी बौध्दांच्या विज्ञानवादाचे खंडन करताना बाह्य सृष्टी इंद्रियास जशी दिसते-जाणवते तशीच मानली आहे. पण एरव्ही ते बाह्य सृष्टीला नामरुपात्मक अत एव मिथ्या मानतात. दुसरे असे की आचार्यांनी मायावादाची मांडणी बौध्द विचारांच्या प्रभावाने केली आहे. उपनिषदात या वादाचा गीता रहस्य : एक अध्ययन