Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हटलेले आहे. (पहा - प्रतीकारो व्याधेः सुखमिति विपर्यस्यति जनः वैराग्य. १९) यासाठीच सुख व दुःख या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. असे गीतेत म्हटले आहे. आता आणखी एक समजूत अशी आढळते की दुःखाचा अनुभव आल्यावर सुखाची गोडी अधिक वाटते. रणरणत्या उन्हात भटकणाऱ्या माणसालाच वटवृक्षाच्या छायेचे महत्व कळते. कालिदासही म्हणतो: ‘‘यदेवोपनतं दुःखात्सुखं तद्रसवत्तरम । निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषतः ॥ - (विक्रमो. ३.२१) म्हणजे दुःख सोसल्यानंतर लाभणारे सौख्य अधिक मधुर असते. झाडाची सावली उन्हात तापलेल्यालाच अधिक समाधान देते. - या मतात थोडेफार तथ्य आहे. टिळक लिहितात - निदान एवढी गोष्ट निर्विवाद आहे की दुःखानंतर प्राप्त होणारी गोड गोडी, आणि नेहमी विषयोपभोगात गढलेल्या पुरुषाला लाभणारी सुखातील गोडी या मध्ये पुष्कळ अंतर आहे. (पृष्ठ ९५ ) तिसरा विचार असा की जगात सुख अधिक आहे की दुःख हा प्रश्न नेहमी पडतो. 'सुख जवापाडे दुःख पर्वताएवढे' असे संत तुकारामांनी म्हटले आहे. त्यावरुन माणसाला जीवनात सुखापेक्षा दुःखच अधिक अनुभवावे लागते, ही गोष्ट खरी आहे. या दुःखाना कंटाळून काही जण आत्महत्या ही करतात पण बहुसंख्य लोक संसारातील दुःखे सोसूनही जीवन जगतात याला कारण जगण्याची प्रबळ इच्छा, हे आहे. आज ना उद्या परिस्थिती पालटेल व सुखाचे दिवस येतील ह्या आशेवर ते काळ कंठीत असतात. माणसे आत्महत्या करीत नाही, याचा अर्थ संसार सुखमय आहे, असा नाही. आपल्या एकंदर इच्छापैकी किती इच्छा पूर्ण होतात, यावर जीवनातील सुखदुःखाचे प्रमाण अवलंबून आहे. आता सामाजिक प्रगती मुळे त्यात फरक पडतो. अन्न, वस्त्र, निवारा ह्या अत्यावश्यक गरजा आता आपल्याला जाणवत नाहीत. सुखाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. दुसरे असे की सुखाच्या उपभोगाने माणसाला तृप्ती होत नाही. ते सतत मिळावेसे वाटते. महाभारतातील ययातीची गोष्ट हेच सांगणारी आहे. पुत्राचे तारुण्य घेऊनही त्याची कामवासना शमली नाही. अग्नील गीता रहस्य : एक अध्ययन