Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) गीतारहस्याचा प्रकरणवार सारांश लोकमान्यानी गीतारहस्यात नेमके काय सांगितले आहे, हे समजून घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे त्यातील प्रकरणांचा गोषवारा तयार करणे हा आहे. पण असा काहीसा प्रयत्न प्रा. न. र. फाटकांनी आपल्या टिळक चरित्रात केला आहे. काहीसा म्हणण्याचे कारण म्हणजे अध्यात्म या नवव्या प्रकरणापर्यंत त्यानी उत्तम सारांश लिहिलेला आहे पण कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य' या दहाव्या प्रकरणापासून उपसंहार या पंधराव्या प्रकरणापर्यंत त्यानी दोन पानातच सारांश संपविला आहे. असे का व्हावे, हे समजत नाही. वरील प्रकरणे त्याना महत्वाची वाटली नाहीत काय ? अथवा डॉ. वि. रा. करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे फाटक थकले की काय ? आणि ज्यात टिळकांच्या स्वतंत्र विचाराचा गाभा आला आहे व ज्ञानोत्तर कर्म त्याग न करता ज्ञानी पुरुषानी आमरणात निष्कामबुध्दीने कर्म करीत रहावे. या आपल्या सिध्दांताची मांडणी त्यानी केली आहे. त्या प्रकरणांचा आढावा कसा तरी गुंडाळून टाकल्या सारखा झाला आहे. (ग्रंथवेध पृष्ठ १६) डॉ. करंदीकरांचे हे उद्गार सार्थ आहेत. अर्थात टिळकांच्या चरित्रात आलेला गीतारहस्याचा गोषवारा थोडा त्रोटक असला तर त्यात काही नवल नाही. या ठिकाणी सोप्या शब्दात आणि स्वतंत्रपणे तो सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. विषय सुबोध होण्यासाठी आवश्यक ती माहितीही दिली आहे. प्रस्तावनेच्या अखेरी लोकमान्यांनी गीताशास्त्राचे प्रयोजन हे थोडक्यात सांगितले आहे. तेच त्यांच्या ग्रंथातील विवेचनाचे मुख्य सूत्र आहे. निव्वळ स्वार्थ परायण बुध्दीने संसार करुन थकल्या भागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही, गीता सांगितली नसून संसारच मोक्षदृष्टया कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय याचा तात्विक दृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झाली आहे. (प्रस्ता. पृष्ठ १९ ) गीता रहस्य : एक अध्ययन