हा होणारा भास साम्यामुळे होतो. पूर्वी आपण साप पाहिलेला असतो. अंधारात पडलेली दोरी ही आकार आणि रूप यामुळे सापासारखी दिसते. ज्याने पूर्वी कधीही साप पाहिलेला नाही त्याला दोरी पाहून सापाचे स्मरण होणार नाही व त्याचा भासही होणार नाही. अद्वैतमतात ब्रह्म व आत्मा यांचे स्वरूप एकच असल्यामुळे मुक्तीनंतर आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. यालाच अद्वैत असे म्हटलेले आहे. या बाबतीतच पुढे वेगवेगळे संप्रदाय उत्पन्न झाले. शंकराचार्यांनंतर रामानुजाचार्यांनी (इ. स. १०१७ ते ११३९) विशिष्टाद्वैत मताची मांडणी केली. त्यांनी चित्, अचित् व ईश्वर अशी तीन तत्वे मानली आहेत. यापैकी चित् म्हणजे जीवात्मा जो प्रति शरीरी भिन्न आहे. तो अणु परिमाण आहे. चेतन असल्याने शरीरव्यापी आहे. अचित् म्हणजे चराचर सृष्टी - ती अचेतन आहे पण वास्तव आहे. मायावादी सांगतात त्याप्रमाणे भासमान् - मिथ्या • खोटी नाही. ईश्वर हा निर्गुण नसून अनेक गुणांनी संपन्न आहे. जगत् हे त्याचे शरीर आहे. - - जीवाने प्रपंचातून सुटण्यासाठी ईश्वराची उपासना केली पाहिजे. मोक्षामध्ये जीवाचे ईश्वराशी ऐक्य होत नाही. तर त्याला ईश्वरासारखे रूप मिळते. हे अद्वैत विशिष्ट प्रकारचे असल्याने या मतास विशिष्टाद्वैत असे नाव मिळाले आहे. मायावादाचे खंडन करणे हे रामानुजाचार्यांचे महत्वपूर्ण कार्य आहे. त्यांनी मायावादाचा सखोल अभ्यास करून त्यामध्ये १ ) आश्रयानुपपत्ति २) तिरोधानानुपपत्ति ३) स्वरूपानुपपत्ति ४) अनिर्वचनियानुपपत्ति ५) प्रमाणानुपपत्ति ६) निवर्तकानुपपत्ति व ७) निवृत्त्यनुपपत्ति असे सात प्रकारचे दोष दाखवले आहेत. पंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकरांनी आपल्या 'अद्वैतामोदामध्ये रामानुजांच्या या आक्षेपांचे साधार खंडन केले आहे. निंबार्काचार्य हे रामानुजाचार्यांनंतर होऊन गेले. हे वैष्णवपंथी तेलंगी ब्राह्मण असून त्यांचा जन्म वेल्लारी जिल्ह्यातील निंब अथवा निंबपुरा येथे झाला. ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेले. त्यांच्यावर रामानुजार्यांच्या मताचा प्रभाव आहे. यांनी द्वैताद्वैत मताची मांडणी केली आहे. त्यांनीही चित्, अचित् व ईश्वर अशी तीन तत्वे मानली आहेत. मात्र त्यांनी यास भोकृत (जीव) भोज्य (जगत् ) व नियंतृ गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/२३
Appearance