कुचकामाचे ठरविले आहे. सारांश, तर्कबुद्धीला त्यानी गौण स्थान दिले आहे. याच्याच जोडीला कर्मसिद्धांत व पुनर्जन्म यांचा स्वीकार केला आहे. भाष्यकारांच्या मदतीशिवाय सूत्रांचा स्पष्ट अर्थबोध होत नसला तरी सूत्रकारांचा एकंदर अभिप्राय काय आहे, याचा अंदाज बांधणे फारसे कठीण नाही. गीता प्रेस गोरखपुरने प्रकाशित केलेल्या श्रीहरिकृष्णदास गोयंका यांच्या 'वेदांत दर्शन' या हिंदी पुस्तकात वेदांतसूत्रातील निष्कर्ष मांडले आहेत. त्यातील अत्यंत महत्वाच्या भागाचा अनुवाद पुढे दिला आहे. १) या जडचेतनात्मक सृष्टीचे उपादान व निमित्त कारण ब्रह्म हेच आहे. २) परब्रह्म परमात्मा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी आपल्या परा व अपरा प्रकृतीच्या साहाय्याने सृष्टीची निर्मिती करतो व प्रलयाच्यावेळी तिचा स्वतःमध्ये लय करतो, ३) जीव हा परा प्रकृतीचा समुदाय असल्याने परमात्म्याचा अंश आहे. परमेश्वर जीवाच्या कर्मफलाची व्यवस्था लावणारा आहे. ४) जीव हा नित्य आहे. जन्म व मृत्यू हे जीवास शरीराच्या योगे चिकटलेले आहेत. मृत्यूनंतर जीवाचा शरीराशी कोणताही संबंध राहात नाही. ५) निष्काम अशा ज्ञानी पुरुषास येथेच ब्रह्मप्राप्ती होते. त्याला ब्रह्मलोकात जावे लागत नाही. ज्ञानी पुरुष लोक संग्रहार्थ सर्व प्रकारची विहित कर्मे करतो. - ६) ब्रह्मज्ञान कोणत्याही आश्रमात - म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास होऊ शकते. ब्रह्मलोकात गेल्यानंतर त्याला पुन: जन्म प्राप्त होत नाही. ७) ज्ञानी पुरूषांच्या पूर्वसंचित पापपुण्याचा संपूर्ण क्षय होतो. नवीन कर्माचा त्यास लेप लागत नाही. प्रारब्धकर्माचा उपभोग झाल्यावरच त्यास मृत्यू येतो व .सद्गती प्राप्त होते इत्यादि (वेदांतदर्शन पृष्ठ ) - गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/२१
Appearance