Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शास्त्राचे एक अंग आहे,असे म्हणावे लागते. त्यामुळे वेदांतशास्त्राचे शुध्द वेदांत व व्यावहारिक वेदांत असे दोन भेद होतात. आता साम्यबुध्दी ही श्रेष्ठ आहे, हे मान्य केले तरी नीतिशास्त्रात अनेक पंथ का निर्माण झाले याचाही विचार करावा लागतो. बायबलमध्ये सगुण परमेश्वराने सृष्टीची रचना केली असून माणसाने कसे वागावे याचे नियम घालून दिले आहेत. पण हे नियम व्यवहारात अपुरे आहेत असे दिसून आल्यावर माणसाच्या सदसद्विवेक बुध्दीची कल्पना करण्यात आली. पण बायबलात दिलेली सृष्ट्युत्पत्ती कथा व ईश्वराची इच्छाशक्ती इत्यादी गोष्टी खऱ्या नाहीत. हे लक्षात आले मग विचारवंतांनी ईश्वराचा विचार बाजूला ठेवून नीतिशास्त्राची उभारणी केली. पण दृश्य सृष्टीच्या मुळाशी एक अव्यक्त तत्व आहे, या गोष्टीवर आधिभौतिक वाद्यांचा विश्वास नव्हता. यासाठी गीतारहस्यात नीतिशास्त्राचे आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक असे तीन पंथ होतात, असे सांगून त्यांचे विवेचन केले आहे. आधिदैविक पंथात सगुण ईश्वर हा सृष्टीची निर्मिती करतो, हा विचार आहे. आधिभौतिक वादी सृष्टी जशी निर्माण झाली आहे तशीच मानून तिच्या नियमांचा शोध घेतात. त्याना ती कोणी उत्पन्न केली या प्रश्नाशी कर्तव्य नाही. आध्यात्मिक पंथ हा सृष्टीच्या मुळाशी अव्यक्त तत्व मानतो, असा या तीन पंथात फरक आहे. पण आधिभौतिक पंथातील विचारवंतांना केवळ सृष्टीचा अभ्यास करून समाधान वाटेना.तेव्हा जड सृष्टीचे ज्याला ज्ञान होते, तो आत्मा त्या सृष्टीहून भिन्न आहे अशी ग्रीन याला जाणीव झाली. तसेच आधिभौतिक सुखाहून त्याच्या पलीकडे असलेल्या आध्यात्मिक सुखाचीही जाणीव होऊ लागली. थोर मनुष्य आपल्या सुखाचा विचार न करता परहितार्थ का झटतो, या प्रश्नाचे मग त्याना उत्तर मिळाले. आता पाश्चात्यांचा विचार बाजूला ठेवून वेदांतशास्त्राचा सिध्दांत काय आहे, हे पाहिले पाहिजे. ज्ञान झाल्यावर त्या पुरुषाने सर्व कर्मांचा त्याग करुन आपले आयुष्य संन्यस्त वृत्तीने व्यतीत करावयाचे की लोकसंग्रहार्थ निष्काम कर्माचरण करुन लोकांना आदर्श घालून द्यावयाचा असे दोन मार्ग संभवतात पहिल्यास संन्यासयोग तर दुसऱ्यास कर्मयोग असे नाव आहे. पहिला पक्ष शंकराचार्यांचा असून दुसरा लोकमान्यांचा आहे, हे आता पर्यंतच्या विवेचनावरुन स्पष्ट झाले आहे. गीता रहस्य : एक अध्ययन