Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- १३) भक्तिमार्ग – आतापर्यंत केलेले विवेचन हे तात्विक होते. ते केवळ बुद्धीलाच समजणारे होते. पण तत्वज्ञानास श्रध्देचीही जोड आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. विश्वास आणि श्रध्दा यावरच जगाचे व्यवहार चाललेले आहेत. आणि तत्वज्ञानात देखील बुध्दीला न समजण्यासारखा भाग बराच असतो. प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन ज्ञान प्रमाणाप्रमाणे आप्त वा शब्द या तिसऱ्या प्रमाणांचा स्वीकार सांख्य, न्याय व वेदांत मतात करण्यात आला आहे. शब्द म्हणजे वेद होय. वेद हे ईश्वरप्रणीत आहेत त्यामुळे त्यातील सर्व वचने ही त्रिकालाबाधित आहेत, असा आपला विश्वास आहे. त्यामुळे वेदांतमतात प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणापेक्षा श्रुती आणि स्मृती या प्रमाणास अधिक महत्व दिले आहे. इतकेच नव्हे जे ज्ञान श्रुती प्रमाणास विरोधी असेल ते त्यानी कुचकामाचे ठरवले आहे. श्रध्देचे महत्व सांगणाऱ्या छांदोग्यश्रुतीतील एका गोष्टीचा लोकमान्यानी उल्लेख केला आहे. अव्यक्त व सूक्ष्म ब्रहम हे दृश्य सृष्टीचे मूळ आहे. हे सिध्द करण्यासाठी श्वेतकेतूच्या बापाने त्याला वडाच्या झाडाचे फळ फोडण्यास सांगितले. आत लहानलहान बिया होत्या. मग त्यातले एक बी घेऊन ते फोडण्यास सांगितले व आत काय दिसते ते विचारले. श्वेत केतूने ते बी फोडले व 'आत काही नाही' असे म्हटले. तेव्हा याचा बाप म्हणाला "तुला आत जे काही दिसत नाही, त्यापासूनच हे वडाचे मोठे झाड निर्माण झाले आहे यावर विश्वास ठेव (श्रध्दस्व) ". तेव्हा ज्ञानेंद्रियास अथवा बुध्दीस काही गोष्टीचे ज्ञान होत नाही, हे मान्य केले पाहिजे. याचा अर्थ त्यांची संगत सोडून द्यायची असा नाही. "सर्व सृष्टीचा बुडाशी असणारे मूळ तत्व अनादि, अनंत, सर्वकृत, स्वतंत्र व चैतन्यरुप आहे, हे पूर्णपणे ओळखण्यास बुध्दीच्या गाडी रस्त्याने शक्य तेवढा मार्ग आक्रमिल्यावर तदनुरोधाने पण त्याच्या पुढे थोडेतरी श्रध्देच्या व प्रेमाच्या पायवाटेनेच गेले पाहिजे, हे निर्विवाद आहे'. (पृष्ठ ३७८) श्रद्धा आणि बुद्धी यातील फरक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दिलेले उदाहरण अत्यंत मार्मिक आहे. आपली आई आपल्याला देवासारखी पूज्य व वंद्य वाटते पण इतर लोक तिला सामान्य स्त्री म्हणूनच ओळखतात. न्यायशास्त्रात आईचे लक्षण ‘गर्भधारणा व प्रसूती हे धर्म असणारी स्त्री' असे दिले आहे. निर्गुण ब्रहमाचे स्वरुप गीता रहस्य : एक अध्ययन