पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० गीतारहस्यं अथवा कर्मयोग


वृत्तींस अनुकूल किंवा प्रतिकूल असतील त्याप्रमाणें मनुष्यास सुख किंवा दुःख होत असतें असें सुखदुःखांच्या वस्तुस्वरूपाचे लक्षण वर दिलें आहे. पण सुखदुःखांचा विचार केवळ या व्याख्येनेंच पुरा होत नाहीं. आधिभौतिक सुखदुःखें उत्पन्न होण्यास बाह्य पदार्थाचा इंद्रियांशी संयोग होणें हें जरी प्रथमतः अवश्य आहे तरी या सुखदुःखांचा अनुभव मनुष्यास पुढें कोणत्या रीतीनें येत असतो याचा जर विचार केला तर असें आढळून येईल कीं, इंद्रियांच्या व्यापारांनी निष्पन्न होणारीं हीं सुखदुःखें जाणण्याचे म्हणजे आपल्या पदरात बांधून घेण्याचें काम प्रत्येक मनुष्यास अखेरीस आपल्या मनानेंच करावें लागत असतें. “चक्षुःपश्यति रूपाणि मनसा न तु चक्षुषा” - पाहण्याचे काम केवळ डोळ्यांनीच होत नसून मनाचे त्यास जरूर साह्य लागतें (म.भा.शां ३११.१७), आणि तें मन जर व्याकुल असलें तर डोळ्यांनी पाहूनहि न पाहिल्यासारखें होतें, असें महाभारतांत म्हटलें असून, बृहदारण्यकोपनिषदांतहि “माझें मन दुसरीकडे होतें म्हणून मला दिसले नाहीं (अन्यत्रमना अभूवं नादर्शम), माझे मन दुसरीकडे होते म्हणून मला ऐकू आले नाही (अन्यत्रमना अभूवं नाश्रौषम्),” असें वर्णन आहे (बृ १.५.३). ह्यावरून आधिभौतिक सुखदुःखांचा अनुभव घडण्यास केवळ इंद्रियेंच कारण नसून त्यांस पुढे मनाचे साह्य असावें लागतें असें उघड होतेː आणि आध्यात्मिक सुखदुःखें तर मानसिकच असतात. एतावता सर्व प्रकारचा सुखदुःखानुभव अखेर मनावरच अवलंबून असतो असें दिसून येतें: आणि जर हें खरें, तर मनोनिग्रहानें सुखदुःखानुभवाचाहि निग्रह होणे अशक्य नाही असें पुढे आपोआपच प्राप्त होतें. हाच आभिप्राय मनांत आणून मनूनं सुखदुःखांचे लक्षण नैय्यायिकांच्या लक्षणाहून निरळ्या प्रकारें सांगितलें आहे. तो म्हणतो --

            सर्व परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।
            एतद्विद्यात्समांसेन लक्षणं सुखनदुःखेनयोः ॥ 

“परक्यांच्या (बाह्य वस्तूंच्या) जें कांहीं ताब्यांत असतें तें सर्व दुःख, आणि स्वत:च्या (मनाच्या) ताब्यांत जें असतें तें सुख हें सुखदुःखांचे संक्षिप्त लक्षण होय” (मनु. ४.१६०). नैय्यायिकांच्या लक्षणांतील ‘वेदना’ शब्दांत शारीरिक व मानसिक अशा दुहेरी वेदनांचा समावेश होत असून सुखदुःखाचें बाह्य वस्तुस्वरूपहि त्यानें दाखविले जातें आणि मनूचा कटाक्ष सुखदुःखींच्या केवळ आभ्यंतरानुभवावर आहे, हें लक्षांत आणिलें म्हणजें सुखदुःखाच्या या दोन लक्षणांत विरोध रहात नाही. सुखदुःखानुभवाची इंद्रियावलंबिता याप्रमाणे नाहीशी झाल्यावर --

           भैषज्यमेतद् दुःखस्य यदेतन्नानुचिंतयेत् ।

‘दुःखाचे मनानें चिंतन करीत न बसणे हेंच दुःखनिवारणचे वस्ताद औषध होतें”