पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग

थोड्या शब्दाभेदाने भगवद्गीतेचीच[टंकनभेद] हुबेहुब नक्कल आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ईश्वरगीता कूर्मपुराणाच्या उत्तरविभागात पहिल्या अध्यायांत आलेली असून, पुढील अध्यायांत व्यासगीतेला सुरूवात झालेली आहे; आणि स्कंदपुराणान्तर्गत सुतसंहितेच्या चौथ्या म्हणजे याज्ञवैभव खंडाच्या उपरिभागांत आरंभीचे अध्याय १ ते १२ पर्यंत ब्रह्मगीता आणि ब्रह्मगीतेनंतरच्या आठ अध्यायांत सुतगीता आहे. स्कंदपुराणातील या ब्रह्मगीतेहून निराळी अशी दुसरी एक ब्रह्मगीता योगवासिष्ठातील निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धात सर्ग १७३ ते १८१ पर्यंत आलेली आहे. यमगीता तीन प्रकारच्या आहेत. पहिली विष्णुपुराणाच्या तिसऱ्या अंशाच्या ७ व्या अध्यायात, दुसरी अग्निपुराणाच्या तिसऱ्या खंडाच्या ३८१ व्या अध्यायात आणि तिसरी नृसिंहपुराणाच्या ८ व्या अध्यायात आलेली आलेली आहे. रामगीतेची गोष्टही अशीच आहे. आमच्याकडे जी रामगीता प्रचारात आहे ती अध्यात्मरामायणाच्या उत्तरकांडाच्या ५ व्या सर्गात असून, हे अध्यात्मरामायण ब्रह्मांडपुराणाचा एक भाग आहे असे मानितात. परंतु याशिवाय दुसरीहि एक रामगीता मद्रासकडे प्रसिद्ध असलेल्या 'गुरूज्ञानवासिष्ठतत्त्वसारायण' नांवाच्या ग्रंथात आलेली आहे. हा ग्रंथ वेदान्ताचा असून ज्ञान, उपासना व कर्म अशी त्याची तीन कांडे आहेत. पैकी उपासनाकांडाच्या द्वितीय पादाच्या पहिल्या अठरा अध्यायांत रामगीता, आणि तिसऱ्या म्हणजे कर्मकांडाच्या तृतीय पादाच्या पहिल्या पाच अध्यायांत सूर्यगीता, निरूपिली आहे. शिवगीता हि पद्मपुराणाच्या पातालकांडात आहे असे म्हणतात. पण या पुराणाची पुणे येथील आनंदाश्रमात जी प्रत छापलेली आहे तीमध्ये शिवगीता आढळून येत नाही. गौडीय पद्मोत्तरपुराणात ती सापडते असे पंडित ज्वालाप्रसाद यांनी आपल्या 'अष्टादशपुराणदर्शन' नांवाच्या ग्रंथात लिहिले असून, नारदपुरणात इतर पुराणांबरोबर पदमपुराणाचीहि जी विषयानुक्रमणिका दिलेली आहे तीमध्येही शिवागीतेचा उल्लेख आहे. याखेरीज श्रीमद्भागवतपुराणात स्कंध ११ अध्याय १३ यात हंसगीता व अध्याय २३ यात भिक्षुगीता आलेली असून, तिसऱ्या स्कंधातील कापिलेयोपाख्यानासहि (अ. २३-३३) 'कपिलगीता' असे नांव कित्येक देतात; परंतु 'कपिलगीता' म्हणून एक स्वतंत्र छापील ग्रंथ आमचे पाहण्यात आहे. ही कपिलगीता हठयोगप्रधान असून, ती पद्मपुराणातून घेतली असा त्यात उल्लेख आहे. पण पद्मपुराणात ही सापडत नाही इतकेच नव्हे, तर यात एके ठिकाणी (४.७) जैन, जंगम (लिंगाइत) व सोफी (मुसलमान साधु) यांचा उल्लेख असल्यामुळे ही गीता मुसलमानी अमलानंतरची असावी असे म्हणणे भाग पडते. भागवतपुराणाप्रमाणे देवी भागवतातहि ७ व्या स्कंधाच्या ३१ व ४० अध्यायांपर्यंत एक गीता असून, ती देवीने सांगितली असल्यामुळे तिला 'देविगीता' असे नांव आहे. याखेरीज खुद्द भगवद्गीतेचेच[टंकनभेद] सार