पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यंग राहिले असल्यास तें दाखविण्याचें काम रा.रा. हरि रघुनाथ भागवत यांनी एकट्यांनीच केलेलें आहे. अर्थात् याच्या मदतीखेरीज हा ग्रंथ इतक्या लवकर केवळ आमच्या हातूनच प्रसिद्ध होणे शक्य नव्हतें. म्हणून या सर्वांचे मन:पूर्वक येथें आभार मानिले पाहिजेत. सरतेशेवटी चित्रशाळा छापखाण्याचे मालक यांनी हे काम काळजीनें व शक्य तेवढें लवकर छापून देण्याचें पत्करून त्याप्रमाणें तडीस नेल्याबद्दल त्यांचे हि आभार मानणें जरूर आहे. शेतांत पीक आलें तरी त्याचें अन्न तयार होऊन खाणाराच्या मुखांत पडेपर्यंत अनेक लोकांच्या साहाय्याची जशी अपेक्षा लागत्ये तद्वतच कांही अंशी ग्रंथकाराची-निदानपक्षीं आमची तरी-स्थिती आहे असें म्हणण्यास हरकत नाही. म्हणून वरील प्रकारें आम्हांस साहाय्य करणाऱ्या सर्व लोकांचे- त्यांची नांवें वर आलेली असोत वा नसोत- आम्ही पुनः एकवार आभार मानून ही प्रस्तावना संपवितों.

प्रस्तावना संपली. आतां ज्या विषयाच्या विचारांत आज पुष्कळ वर्षे घालविलीं व ज्याच्या नित्य सहवासानें मनाचें समाधान होऊन आनंद होत् गेला, तो विषय ग्रंथरूपानें हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटत असलें तरी हे विचार- साधल्यास सव्याज. नाहींपेक्षा निदान जसेच्या तसे- पुढील पिढीतील लोकांस देण्यासाठीच आम्हांस प्राप्त झाले असल्यामुळें, वैदिक धर्मातील राजगुह्याचा हा परीस "उत्तिष्ठत! जाग्रत ! प्राप्य वरान्निबोधत !" - उठा ! जागे व्हा ! आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या ! - या कठोपनिषदांतील मंत्राने (कठ. ३.१४) प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करितों. यांतच कर्माकर्माम्चे सर्व बीज आहे; आणि या धर्माचें स्वल्पाचरणही मोठ्या संकटातून सोडवितें, असें खुद्द भगवंताचेंच निश्चयपूर्वक आश्वासन आहे. यापेक्षां आणखी जास्त काय पाहिजे ? ‘‘केल्याविण काही होत नाही,’’ हा सृष्टीचा नियम लक्षात आणून तुम्ही मात्र निष्काम बुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झाले.निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही गीता सांगितलेली नसून,संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय, याचा तात्त्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणे शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकाने समजून घेतल्याखेरीज राहू नये, एवढीच आमची शेवटी विनंति आहे.

पुणें,अधिक वैशाख शके १८३७बाळ गंगाधर टिळक