पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४

गीतारहस्य अथवा कर्मयोग

ग्रंथांत केलेला असल्यामुळें त्यांची येथें पुनरुक्ति करीत नाहीं. तसेंच पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांचा 'कृष्ण व गीता' या नांवाचा एक इंग्रजी ग्रंथहि अलीकडे प्रसिद्ध झाला असून त्यांत सदर पंडितांनीं गीतेवर दिलेलीं बारा व्याख्यानें छापिलीं आहेत. पण या अगर मि. ब्रुक्स यांच्या व आमच्या प्रतिपादनांत पुष्कळ अंतर आहे हे सदर ग्रंथ वाचिले असतां कोणाच्याहि लक्षांत येईल. तथापि वरील लेखांवरून गीतेसंबंधानें आमचे विचार अपूर्व नसून गीतेंतील कर्मयोगाकडे लोकांचे अधिकाधिक लक्ष लागत चालल्याचें सुचिन्ह असल्यामुळें आम्ही या सर्व आधुनिक लेखकांचें येथें अभिनंदन करितों.

हा ग्रंथ मन्दलेस लिहून झाला खरा; पण तो शिसपेन्सिलीनें लिहिलेला असून त्यांत बऱ्याच ठिकाणीं खोडाखोड केलेली व शोध घातलेले होते. म्हणून पुढें तो सरकारांत जाऊन परत आल्यावर त्याची छापण्यासाठीं शुद्ध नक्कल[टंकनभेद] करणें जरूर होतें; आणि हें काम आमच्यावर पडलें असतें तर ग्रंथ प्रसिद्ध होण्यास आणखी किती महिने लागले असते कोणास ठाऊक! पण रा. रा. वामन गोपाळ जोशी, नारायण कृष्ण गोगटे, रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर, अप्पाजी विष्णु कुळकर्णी वगैरे गृहस्थांनी या कामी हौसेनें मदत करून ते जलदीनें पुरें केलें याबद्दल त्यांचे आभार मानिले पाहिजेत. तसेंच रा. रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी, आणि विशेषेंकरून वेदशास्त्रसंपन्न दीक्षित काशीनाथशास्त्री लेले यांनी हे मुद्दाम मुंबईहून येथें येऊन, ग्रंथाची लेखी प्रत वाचण्याची तसदी घेतली आणि बऱ्याच उपयुक्त व मार्मिक सूचना केल्या याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहो. तथापि ग्रंथातील मतांबद्दलची जबाबदारी सर्वस्वी आमची आहे हें विसरता कामा नये. ग्रंथ याप्रमाणें छापण्यास तयार झाला. पण लढाईमुळें कागदांची उणीव पडणार होती. ती मुंबईतील स्वदेशी कागदाच्या गिरणीचे मालक मेसर्स डी. पदमजी आणि सन यांनी वेळेवर आमच्या मताप्रमाणे चांगला कागद पुरविल्यामुळे दूर झाली, व गीतेचा ग्रंथ चांगल्या स्वदेशी कागदावर छापावयास मिळाला. तथापि ग्रंथ छापताना तो अजमासाबाहेर वाढल्यामुळें पुनः कागदाची उणीव पडली; व ती पुण्यांतील रे पेपर मिलच्या मालकांनी भरून काढिली नसती तर आणखी कांही महिने ग्रंथ प्रसिद्ध होण्याची वाचकांस वाट पहावी लागली असती. म्हणून वरील दोन्ही गिरण्यांचे मालक यांचे आम्हींच नव्हे तर वाचकांनींही आभार मानिले पाहिजेत. शेवटी प्रुफें तपासण्याचें काम राहिलें. हे रा. रा. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रा. रा. रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर आणि रा. रा. हरि रघुनाथ भागवत यांनी पत्करिलें. त्यांतहि जागोजाग आलेले इतर ग्रंथांचे उल्लेख बरोबर आहेत कीं नाहींत हें तपासण्याचें व कोठे कांही