पान:गाव झिजत आहे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजला जात होता. माझ्या लहानपणी मी म्हण ऐकली होती, "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी" परंतु राज्य ब्रिटिशांचे आले आणि नोकरीची किंमत वाढली. ब्रिटिशांच्या काळात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यांनी ही म्हण बदलली आणि आज "उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती" असे म्हणावे अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. शेती हा आतबट्टयाचा व्यवहार आहे. तो शारीरिक कष्टाचा आहे. निसर्गावर, किंबहुना पावसावर तो अवलंबून आहे. त्यामुळे या व्यवसायाकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती ब्रिटिश काळानंतर सुरू झाली. हे खरे की,आजची शेतीकडे बघण्याची दृष्टी ब्रिटिशांनी केलेल्या दुर्लक्षाचे कारण आहे. त्यामुळेशेतीव्यवसाय करणाऱ्यांना समाजात आणि राजकारणातही फारशी प्रतिष्ठा मिळत नाही.अशी काही कारणे श्रमाला प्राधान्य देणारी नसली तरी गेल्या५० वर्षांत आपल्याशेतकऱ्यांचे उत्पन्न इतर उत्पादकांच्या प्रमाणात वाढले नाही याला अनेक कारणे आहेत.त्यापैकी एक, पण महत्त्वाचे कारण इथे नमूद करण्यासारखे आहे.  गेल्या ५० वर्षांत समाजातील शेतीव्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्यांना समाजरचनेच्या चुकीच्या घडणीमुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे अधिक स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगलीच बळकट झाली. हे स्वातंत्र्य म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची किंमत ठरविण्याचे. हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण उदाहरण घेउया वकिलाचे. वकिलाकडे जेव्हा एखादा अशील जातो तेव्हा वकील त्या अशिलासाठी करावयाच्या कायदेशीर कामाची किंमत म्हणजे त्याची फी सांगत असतो. डॉक्टरकडे एखादा पेशंट गेला तर डॉक्टर तपासणी आणि औषधाची फी पेशंटला सांगतो. कापडाची किंमत कापड दुकानदार सांगतो. किंमत सांगण्याचा मुद्दा यासाठी इथे लक्षात आणून द्यायचा की, समाजातल्या ठराविक व्यवसाय करणारांना स्वत:च्या बौद्धिक, शारीरिक किंवा स्वतः निर्माण केलेल्या वस्तूंची किंमत सांगण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात हा अधिकार सर्वच घटक वापरू शकत नाहीत. जेव्हा मजुरांचा तुटवडा असतो तेव्हा मजूर आपल्या श्रमाची किंमत म्हणजे मजुरी वाढवून मागू शकतात. मात्र असे क्वचितच घडते. सदासर्वकाळ त्यांनाही त्यांच्या मागणीप्रमाणे स्वत:ची मजुरी ठरवता येत नाही. या सर्वांमध्ये शेतकरीअधिक दुर्दैवी ठरला आहे. कारण त्याने निर्माण केलेल्या मालाची किंमत त्याला ठरविता येत नाही. एखाद्या शेतकऱ्याने धाडस केले आणि कृषी उत्पन्न बाजारात आपला माल विक्रीसाठी काढला. त्याचा भाव त्यानेच जाहीर केला तर मार्केटमधील आडत दुकानदार किंवा दलाल आणि तुमच्या आमच्यासारखेही त्याला वेड्यात २०/ गाव झिजत आहे