पान:गाव झिजत आहे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून आता सिद्ध झाले आहे. १९५० च्या सुमारास देशाचे कृषी उत्पादन पन्नास दशलक्ष टन होते. ते सन २००० च्या सुमारास दोनशे दश लक्ष टनांवर पोहचले असे या क्षेत्रात काम करणाऱ्यांची माहिती आहे. एवढे उत्पादन वाढूनही शेतकरी सुखी झाला का? उत्तर नकारार्थीच मिळेल. एखाद्या शेतकऱ्याने गाठले असेल यशाचे शिखर. एखाद्याने कमावले असतील भरपूर पैसे. पण शेतकऱ्याचे उत्पादन वाढल्यामुळे शेतकरी चिंतामुक्त झाला असे काही पाहायला मिळत नाही.म्हणजे शेती उत्पादनवाढीतून शेतकऱ्याचा उत्कर्ष होतो असे म्हणणे चूक ठरले आहे. असं का व्हावे? याचा शोध कदाचित काही लोक घेत असतील. पण मला काही वर्षांपूर्वी अकोला ता. अंबाजोगाई या गावाच्या सरपंचाने जे सांगितले ते नमूद करावेसे वाटते.  मानवलोकच्या कामांसाठी दररोज खेड्यात भ्रमंती करावी लागत होती. गावाशी आणि शेतीशी आमचा संपर्क होता. तकऱ्यांबरोबर काम करण्याचा आमचा निर्धार असल्यामुळे खेड्यांशी संपर्क ठेवणे भागच होते. १९९१ -१९९२ च्या सुमाराला, एके दिवशी सकाळीच कृषक पंचायती बैठका घेण्यासाठी अकोला या गावी गेलो होतो. शेतकरी जमायला वेळ होता म्हणून शाळेत चक्कर मारली. आम्हाला पाहून गुरुजी खूष झाले. आलाच आहात तर मुलांना साने गुरुजींच्या गोड गोष्टी सांगा असा आग्रह त्यांनी धरला. एवढ्यात मुख्याध्यापक कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे गोष्ट सांगणे बाजूला पडले व इतर बाबींवर चर्चा सुरू झाली. सरपंच सांगत होते की, हे गुरुजी फार चांगले आहेत. शाळेतच राहतात. हाताने स्वैपाक करून खातात. मुक्कामाला इथेच राहत असल्यामुळे आमची शाळा सुधारली. हे ऐकून मलाही बरे वाटले. पुढे ही चर्चा लांबली... मी गुरुजींना विचारले गुरुजी, तुम्ही कोणत्या वर्षी नोकरीला लागलात. ते म्हणाले १९६४-६५ चा सुमार असेल. त्यावेळेस मला पगार म्हणून रुपये १४० ते १५० मिळत होते. आता किती मिळतो? माझा प्रश्न. गुरूजींनी आकड्यांची जुळवाजुळव केली आणि म्हणाले, सगळा मिळून रुपये जवळपास आठ ते नऊ हजार मिळतात.पगाराचा आकडा ऐकून संरपचाला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, गुरुजी तुमचं चांगल आहे बुवा! २०-२५ वर्षांत तुमच्या पगारात खूपच वाढ झाली. आम्हा शेतकऱ्यांचं नशीबच फुटकं बघा. तुम्हाला नोकरी लागली त्याच वर्षी आमच्याकडे हायब्रीड सुरू झालं. ६०/- रुपये क्विंटलचा भाव होता. यंदा वीस वर्षांनंतर ३००/-रुपयांच्या वर गेला आहे. आमचं सगळ असंच कासवाच्या गतीनं चाललंय, सरपंचाचं बोलणं मी ऐकत होतो. गुरुजी म्हणाले आमचा पगार महागाईच्या निर्देशांकावर आवलबून असतो.गेल्या वीस पंचवीस वर्षांत महागाईच इतकी वाढली की आमची पगारवाढ करणं सरकारला भागच होते. १२/ गाव झिजत आहे.