पान:गांव-गाडा.pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२      गांव-गाडा,


अधिकारी आपापल्या खात्यांची कामे करतात. फॉरेस्टचे विभाग करून त्यांवर राउंडगार्ड, बीटगार्ड नेमतात. ते आपापल्या हद्दीत फिरून रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या हुकमतींत कामे करतात. स्थावर-जंगमचे दस्तैवज सब रजिस्ट्रार नोंदितो. देवीडॉक्टर गांवोगांव देवी काढीत फिरतो. तालुक्याचे ठिकाणी दवाखाना असतो; तेथें सब्असिस्टंट सर्जन रोग्यांना औषध देतो. बुळकुंड्या, खुरकत वगैरेसारखे जनावरांच्या सांथीचे रोग उद्भवले म्हणजे तालुक्यांत गुरांचा दवाखाना नसल्यास नजीकच्या दवाखान्यावरील ढोर-डॉक्टर येऊन उपचार करतो. सडका वगैरेंचे काम एंजिनीयरकडील सब्ओव्हरसियर, मेस्त्री पाहतात. खेड्यांतील कांहीं शाळा-मास्तरांकडे शाळा व टपाल असते. शाळेसंबंधाचे त्यांचे काम तालुका शाळामास्तरमार्फत व टपालचे सब्-पोस्टमास्तरमार्फत चालतें. पोस्टांत चार आणे तें पांच हजार रुपयांपर्यंत तीन टक्के व्याजाने लोकांच्या ठेवी ठेवतात, व हुंड्या ( मनिऑर्डरी ) पाठवितात. स्थावर-जंगमाचे दाव्याच्या निवाड्यासाठी एक दोन तालुके मिळून सबॉर्डिनेट जज्ज ऊर्फ मुनसफ कोर्ट असते.

 वरीलप्रमाणे पगारी चाकरीखेरीज काही सार्वजनिक कामें सरकारने लोकांच्या विश्वासू पुढाऱ्यांवर बिन-पगारी सोपविली आहेत. फौजदारी कामें चालविण्यास शहरांत मानाचे मॅजिस्ट्रेट नेमले आहेत. तसेंच शेतकऱ्यांचे दहा रुपयांचे आंतील दावे चालविण्यासाठी शेतकरी कायद्याप्रमाणे कांहीं कांहीं गांवांत बिनपगारी गांवमुनसफ नेमले आहेत. पण ते कमी करून गांवपंचायतीकडे हलके दिवाणी दावे देण्याचे घाटत आहे. मुंबईचा १९०१चा कायदा ३-डिस्ट्रिक्ट म्युनिसिपल आक्टान्वये मोठ्या शहरांतून सार्वजनिक आरोग्यरक्षण व प्राथमिक शिक्षण ही कामें म्युनिसिपालिट्यांकडे सोपवून त्यांचा खर्च भागविण्यासाठी त्यांना नागरिकांवर व त्यांच्या व्यापारावर कर बसविण्याचे अधिकार दिले आहेत. म्युनिसिपालटीचा कारभार काही लोकनियुक्त सभासद व कांहीं सरकारने नेमलेले सभासद ह्यांच्या विचाराने चालतो, आणि तिच्या एकंदर व्यवस्थे-