पान:गांव-गाडा.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ६३


राच्या गांवांतले कुणबी असल्या गांवांत जाऊन लागण करीत. जसा मुलकीत तसा दिवाणी फौजदारीतही मामलेदारांनी धुडगूस घातला. ह्याप्रमाणे-देशमुख, देशपांड्ये, पाटील, कुळकर्णी, व इतर वतनदार, बलुतदार, ह्यांच्या कारस्थानांना व पंचांच्या न्यायाला आळा राहिला नाही. पक्ष धरून पाटील-कुळकर्णी व कारूनारू हे खोटींनाटी कामें पुष्कळ करीत. गांवांत कोणीही कामगार व प्रवाशी आला आणि गांवांत कसलीही पंचाईत झाली की कारूनारू चावडीवर जमतात आणि कान पसरून सर्व काही ऐकतात. असली संधि सर्वांपेक्षा महार जागल्यांना अतिशय येई व येते. त्यामुळे हे लोक मोठे तिखट, चौघास, हजरजबाबी, आंगचुकवे व गुलाम झाले आहेत. पाण्यांत राहून माशांशी वैर करूं नये; आपल्याला ज्या लोकांत जन्म काढावयाचा त्यांच्या डोळ्यांवर येऊ नये ह्या भीतीचा गांवमुकादमांवर जो दाब असे तेवढाच काय तो लोकांना थोडाफार न्याय मिळवून देई. त्या वेळच्या काय आणि आतांच्या काय कुणब्यांच्या फिर्यादी म्हटल्या म्हणजे शेतमालाची व जनावरांची चोरी, जळीत, जनावरें मारणे, बांध, उरळ्या व वांटण्या वगैरे स्थावरच्या भानगडी-ह्या असत. कुणब्यांचे आयुष्य बहुतेक रानांत जात असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचालण्यांत विशेष ठेपराई नसते, त्यांना सभाधीटपणा नसतो, आणि पुराव्याच्या खुब्याखाब्या व आडाखें माहीत नसतात. हे गुण गांवांत वापरणारे जे वतनदार कारूनारू व गांवकामगार ह्यांच्यामध्ये पुष्कळ उतरले. हक्क भिकण्यासाठी त्यांना काळी पांढरी पायाखाली घालावी लागे. म्हणून त्यांच्या साक्षीवर काय ती कज्याची मदार असे, व त्यांनी कुणब्याला चांगलेच पोखरलें. पेशवाईचा लय व इंग्रजीचा उदय डोळ्याने पाहिलेला गंगथडीचा परशराम शाहीर म्हणतो:

लोहार, सुतार, कुंभार, परीट, बारा कारू, अडकले ।
त्यांना आडून कज्जा जिंकून बिन-संधीनें कोण आले ? ॥
::...............................................
नवशिक्याला काय पुसावे हजारो टाले टोले ? ॥
----------