पान:गांव-गाडा.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२      गांव-गाडा.


 शेवटच्या रावबाजीने मामलती मक्त्याने देण्याची सुरुवात करून लिलावांत जो जास्त बोलेल त्याला मामलेदार करण्याचा तडाखा लाविला; तेव्हां मामलती खानदानीच्या व कर्तबगारीच्या लोकांकडून निघाल्या, आणि मामलत कमावणे हे भूषण व ती गमावणे म्हणजे नामुष्की ही लौकिक भावना नष्ट झाली. एखाद्याजवळ एकाएकी फार पैसा म्हणजे 'कोठे मामलत गाजविली' असें त्याला विचारण्याचा प्रघात पडला. मक्तेदार मामलेदार कूस ठेवून मामलतीचे पोट-मक्ते देत, व अखेरचा मक्ता पाटील उचली. ह्यामुळे कोणी कोणाचा गुरु ना चेला अशी दुर्दशा झाली. पूर्वी जशी पाटलाची कागाळी मामलेदाराकडे व मामलदाराची दरबाराकडे करतां येई, तसें कांही उरलें नाही. उलट एकमेकांच्या एकमेकांना यथेच्छ चरावयाला मोकळे रान झाले. पाटलाने मक्ता घेतला तर रयतेची काही तरी धडगत लागे. कारण त्याला गांवची माहिती असे. पण जर का तो त्याने पत्करला नाहीं तर रयतेचे बुरे हाल होत. मग वसुलाचे काम मामलेदार करीत. ते खात्याप्रमाणे किंवा लावणीप्रमाणे वसूल न करतां जशी ज्याजवळ माया तशी त्यावर मन मानेल त्या प्रकारची पट्टी आकारीत, आणि ती न दिल्यास मक्ता संपण्यापूर्वी जमिनी खालसा करून त्या विकून आपली तुंबडी भरून काढीत. पीक पदरांत पडण्याच्या आंतच ते किस्त ( हप्ता) नेमीत, त्यामुळे पुष्कळाना सावकाराचा हवाला द्यावा लागे. आणि सावकार जबर व्याज चोपीत. ह्या अमदानींत गांववार दोन इजारपट होत. एक खरा व दुसरा खोटा. खोट्या इजारपटांत आकारणी कमी दाखवीत म्हणून तो पाटील व मामलेदार ह्या दोघांनाही सारखाच उपयोगी पडे. खोटा इजारपट दरबारांत पुढे करून मामलेदार पुढील सालचा मक्ता उतरवी; आणि मामलेदार बदलला म्हणजे नव्या मामलेदाराला तो दाखवून पाटील आपल्या ठोक्याची किंमत उतरवी. पाटील अगर गांवचा इनामदार ह्यांचे जर दरबारांत वजन किंवा संधान असले तर मात्र त्या गांवावर आकार कमी बसे, आणि चढलेल्या आका-