पान:गांव-गाडा.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ६१


आणि त्याने दावा कबूल केला तर दोन्ही घरी दिवा लागेल असा निकाल देई. पाटील-कुळकर्यांना सळ घालता आला नाही, तर वादीप्रतिवादींकडून पंचांकडे कज्या सोपविल्याबद्दल राजीनामा,व पंचनिवाड्याप्रमाणे चालू असा प्रतिज्ञालेख ( कबूली) लिहून घेऊन पंचनिवाडा अमलांत आणण्याबद्दल पाटील जामीन घेई; आणि पंचायतीकडे दावा सोंपवी. पंच बहुधा पक्षकारांच्या दर्जाचे आणि वाद उमजण्यासारखे-जसें जमाखर्ची कामांत पेढीवाले, स्थावर वतनाचे कामांत देशमुख, देशपांड्ये-असे असत. जात-पंचायतींत ज्या त्या जातीचे लोक असत. पंचांत नांव येणे हे मोठे भूषण समजत. पंचांना पक्षकारांकडूनही काही 'हारकी' ( हर्षाने दिलेले बक्षीस ) प्राप्त होत असे. पक्षकारांचे कतबे, जाबजाबाब, व लेखी तोंडी पुरावा घेऊन पंच सारांश लिहून काढीत; त्यांत पुराव्याचा गोषवारा आणि शेवटी निर्वाह ( निवाडा ) असे. पंचायत ज्या गांवांत भरे तेथील कुळकर्णी तिचे लेखी काम करी. जो दावा जिंकी तो सरकारांत हारकी किंवा शेरणी व जो हरी तो गुन्हेगारी देत असे. पंच कोणाचेही बांधलेले चाकर नसल्यामुळे ते वक्तशीर जमत नसत व पंचायतीचे काम रेंगाळत चाले. निर्लोभी पंच व निःपक्षपाती साक्षीदार विरळा. मूठदाबीचा प्रकार जारी असल्यामुळे पुष्कळसे दावे पायरीपायरीने थेट दरबारपर्यंत जात. ज्याच्या तर्फे निवाडा होई तो अमलात आणण्यासाठी तो प्रतिपक्षाकडे गोडीने मागणे करी; त्याने दाद दिली नाही तर तगादा लावी, तगाददाराकडून त्याचे खाणेपिणे बंद करी, त्याच्या डोक्यावर धोंडा देई व त्याला घरांत कोंडून ठेवी; इतक्याने वळले नाही तर त्याच्या घरी बहुधा ब्राह्मणाला धरणे बसवी. मागमागून थकला म्हणजे ब्राह्मण शिव्याशाप देई, आपली शेंडी खुटीला बांधी, डोक्यावर धोंडा घेई, किंवा अन्नपाणी वर्ज करी. ब्राह्मणाला याप्रमाणे यातना भोगण्याला लावून आपण मोठे पाप करतों असें वाटून ऋणको देण्याचा फडशा करून टाकीत. निवाड्याचा अंमल खासगी तगाद्याने झाला नाही तर पाटील मामलेदाराकडे दाद मागत.