पान:गांव-गाडा.pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ४३


प्रांताला दिवाण, फडनवीस, पोतनवीस, मुजूमदार वगैरे वतनदार हुद्देदार असत, त्यांना दरकदार म्हणत. पोतनविसाकडे प्रांताचे नगदीचे हिशेब व फडनविसाकडे सबंध दप्तर होते. दरकदारांची तपासणी परगणे अमलदारांच्या कामांवर असे. परगणे पाटील, देसक, देशमुख, देशपांड्ये, देशकुळकर्णी, देशचौगुला, परगणे-नाईक, महाल नाईक, हे मुख्य वतनदार परगणे-अंमलदार होत. त्यांना जमेदार, महालजमेदार, जमीनदार अथवा हक्कदार म्हणत. देशपरत्वे त्यांचे निरनिराळे पर्याय झाले. देसाई, नाडगीर, नाडकर्णी, नाडगौडा, मुजूमदार, मोहरीर, मोकाशी, शेकदार, हे सर्व महालजमेदार होत. जमेदार, दरकदार व प्रांत-वतनदार ह्यांना बहुमानाने देशाधिकारी म्हणण्याचा संप्रदाय असे. गांवाला जसे पाटील, कुळकर्णी, जागल्या, तसे परगण्याला देशमुख, देशकुळकर्णी, देशपांड्ये, देशचौगुला, परगणे-नाईक हे होत. देशमुख, देशचौगुला हे मराठे; देशपांड्ये, ब्राह्मण; व महाल नाईक भिल्ल, रामोशी, किंवा कोळी असत. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख, देशपांड्ये, परगणे-नाईक, कोठे कोठे दृष्टीस पडतात. सर्व ग्रामाधिकारी वंशपरंपरेचे हुद्देदार होते. ह्या वर्गात नुसतें गांवच्या दप्तरचे काम करणारे गांवकामगार व त्यांचे हाताखालील गांवनोकर येत होते असे नाही, तर यांमध्ये गांवच्या नित्यनैमित्तिक गांवकी व घरकी व्यवहाराला उपयोगी असे कारूनारू, उदमी, तमासगीर, भिक्षुक, वगैरे सर्व येत; आणि त्यांना गांवकीसंबंधाने थोडे फार नेमलेले काम असे. आतांप्रमाणे पूर्वी उद्योगवृद्धि व प्रवाससौकर्य नसल्यामुळे आणि बहुतेक पगारी व वतनी अंमलदार मिजासखोर बनल्यामुळे ते फिरतीवर निघाले म्हणजे त्यांना गांवगन्ना असतील नसतील तितक्या वतनदारांच्या सेवेची गरज पडे; म्हणून ह्या सर्वांची वतने सरकारने मंजूर केली असावीत. वतनांना देशपरत्वे व जातिपरत्वे निरनिराळी नांवें पडली आहेत. इंग्रज सरकाराने उपयोगाच्या दृष्टीने त्यांचे तीन वर्ग केले आहेतः सरकारउपयोगी, रयतउपयोगी, आणि सरकार व रयत ह्या दोघांनाही निरुपयोगी. वतनदारांची