पान:गांव-गाडा.pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६      गांव-गाडा.

 वळल्यामुळे राजाधिकारी व धर्माधिकारी कालांतराने वतनदार झाले आज आहे उद्यां नाही, असल्या मिळकतींत जीव काय ? कांहीं केलें तर ते असे करावें कीं, पिढ्यान् पिढ्या त्याला घोर नाही, ह्या विचाराने वतन निर्माण केले. राजाने राज्य कमावलें तें एकट्याने नव्हे, त्याला अनेक मुत्सद्यांचे आणि वीरांचे साह्य झाले तेव्हां तें त्याच्या हातीं चढले. राज्य संपादन करण्याच्या कामी ज्यांनी आपल्या खांद्याशी खांदा भिडवून संपत्ति, संतति व आपला स्वतःचा प्राण ह्यांची पर्वा केली नाही, त्यांचाच ओढा आपणाकडे असणार, आणि कमावलेलें राज्य संभाळण्यांत त्यांचीच योजना करणे अवश्य व हितकर आहे, असे कृतज्ञतापूर्वक ध्यानांत आणून ज्यांची जशी मदत व प्रेम त्याप्रमाणे राजांनी त्यांना असाम्या दिल्या. स्वतःबरोबरच आपल्या संतानाच्या कल्याणाचा विचार मनांत न बोलावतां येतो, आणि साहजिक असें वाटावयाचें की, नव्याची प्रतीति घेण्यापेक्षां देखला पाणोथा खास बरा. जे आपल्या कामा आले त्यांची संतति आपल्या संततीच्या उपयोगी पडण्याचा संभव अधिक आहे. पूर्वीच्या धामधुमीच्या काळांत जंगमाची किंमत फार कमी होती. स्थावराला चोरांचिलटांची भीति नाही म्हणून तें सुरक्षित असे लोक मानीत. त्यामुळे रोकडीच्या मानाने कमी उत्पन्नाचे स्थावर असले तरी ते निरंतर टिकणारे असते, असा विचार मनांत वागवून कामगार रोकडीपेक्षां स्थावराला जास्त चहात. शिवाय ज्या राजाने स्थावराची नेमणूक करून दिली त्याचे राज्य टिकलें तर ती नेमणूक चालेल, ही गोष्ट कोणालाही कळण्याजोगी आहे. तेव्हां स्थावर नेमणुका करून दिल्या म्हणजे त्या स्वस्त्या पडतील व नेमणूकदार आपल्या पोटतिडिकेसाठी राजनिष्ठ राहातील, इतकेच नव्हे तर राजासाठी पैशानें, शरीराने व स्थावरावरील मालकीमुळे रयतेवर प्राप्त होण्याच्या वजनाने झटतीलही, असें भूपतींना वाटणे साहजिक आहे. दुसऱ्या

-----

१ 'तुल्यवेतनोऽस्मि, भवद्भिःसह भोग्यमिदं राज्यम् ।' अशी प्रसिद्ध राजनीति आहे.