पान:गांव-गाडा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०      गांव-गाडा.


हे अधिकारी जातीपैकींच असून वंशपरंपरेचे म्हणजे वतनदार असतात. जातीमध्ये जी कुळी किंवा घराणे मानाने सर्वांत अग्रगण्य असतें तें पाटलाचें. कदाचित् असेंही असेल की, पाटलाचे घराणे जातीचे आद्य घराणे असावें. ज्याप्रमाणे राज्य मिळविणाराचे घराणें तें राजघराणे असते, त्याप्रमाणे जात अस्तित्वात आणणारे घराणे त्या जातीच्या जातपाटलाचे घराणे असावे असें अनुमान वर ज्या पाटलांच्या संज्ञा दिल्या आहेत त्यांवरून निघेल. शिवाय पाटलाला जातींत पहिल्या 'विड्या टिळ्याचा' म्हणजे सर्वांत मोठा मान असतो. पांढरपेशे व निकृष्ट जाती वजा करतां बाकीच्या मराठजातींत पाटील ही बहुमानदर्शक पदवी आहे. गांवांत डोके हलविणाऱ्या कुणब्याला-मग तो माळी, धनगर, मुसलमान, कोणत्याही जातीचा असो-लोक बहुमानाने पाटील म्हणतात; आणि कुणब्यांच्या सुनाही सासऱ्याला पाटील म्हणून हाका मारतात, मग तो पाटील घराण्यांतला असो वा नसो. पाटलाप्रमाणे जातचौगुल्याचे घराणेही जातींत प्रमुख असते. जातपाटलांची व चौगुल्यांची कांहीं उदाहरणे खाली टिपेंत दिली आहेत. पाटील हा शब्द पटु

-----

१ साताऱ्याकडे धनगरांचे पाटील कऱ्हाडचे गावढे आहेत. तिसगांवकडील भोयांच्या नायकाची कुळी काथवटे, राशीनकडील बेरड - रामोशांच्या पाटलाची कुळी खराडे, तेलंगी कानडे जातीच्या नायकाची कुळी सदगीर व भुसनर, भराड्यांच्या पाटलाची कुळी शिंदे, वैदूंच्या व तिरमलांच्या पाटलाची कुळी फुलमाळी, मेडिंगे जोशांच्या पाटलाची कुळी गदाई, कुडमुडे जोशांच्या पाटलाची कुळी भोंसले, नागपूरकडील औषधे विकणाऱ्या गोंड लोकांच्या पाटलाची कुळी ठाकर, फांसपारध्यांच्या पाटलाची कुळी चव्हाण, माकडवाल्यांच्या (कैकाडी) पाटलाची कुळी सोनकचरे, चित्रकथ्यांच्या पाटलाची कुळी गांगर्डा, मांगगारोड्यांच्या पाटलाची कुळी सकट इत्यादि. साताऱ्याकडील धनगरांचा चौगुला ( भल्ला अथवा खर्चा) देहबा, तेलंगी कानड्यांचा करवर (ह्या जातींत खाडगीर आडनांवाचा जातप्रधान आहे), वैदूंचा भोई, तिरमलांचा धनगर, कुडमुड्या जोशांचा पाचंग्या शिणगाण, फांसपारध्यांचा पवार (ह्याला प्रधान म्हणतात), काही ठिकाणी मांगांचा आढळगे, चित्रकथ्यांचा सुपलकर, मांगगारोड्यांचा बोडके इत्यादि. गुजराथेतील भनसाळी जातीला चौधरी नांवाचा कामगार आहे, तोच या जातीचा चौगुला होय.