पान:गांव-गाडा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति      २९


परत्वें व जातिपरत्वे जातपाटलाला पुढे लिहिल्याप्रमाणे संज्ञा प्राप्त झाल्या. राजा (लाड वंजाऱ्यांचा), राव, गादीवाला, प्रधान, सरपाटील, देसाई, परगणे पाटील, महालकरी, नाईक, फडनाईक, खोत, मुकादम, अधिकारी, मानकरी, कारभारी, अगेवान, मुखी, पाटीदार, महाजन, शेटिया, बुधवंत, गांवडा, कट्टीमनी, मेहतर, देशमेहतर, वडेरो इत्यादि. जातचौगुल्याला हवालदार, कोतवाल, मोहलेदार, पोलकर, तळवार, ठाणी, हाळी, तेलिया, पड्डर वगैरे. कांहीं जातींत ह्यांखेरीज इतर कामगारही नजरेस येतात. अहमदनगर जिल्ह्यांत ‘तेलंगी कानडी' नांवाची जात आकोलें डांगाणांत आहे. तिच्या जातपाटलाला 'नाईक' म्हणतात. त्याच्या हुकमतींत 'प्रधान' आणि 'शिपाई' असतो. प्रधानाच्या सांगण्यावर शिपाई जात गोळा करतो, व अपराध्यास पाटलासमोर इनसाफासाठी धरून आणतो. नाशिककडील भिल्लांच्या जातपाटलाला 'मेहतर ' म्हणतात; आणि त्याचे हाताखाली 'फौजदार' 'हविलदार' असतात. हविलदाराचे काम जमातीला लोक बोलावणे व फौजदाराचे काम त्या वेळी बंदोबस्त ठेवणे हे असते. कर्नाटकांतील ' बेडगू' जातीमध्ये जातपाटलाला 'बुधवंत' म्हणतात, आणि त्याचे मंत्र्यास 'चौलगो' व शिपायास ' कोलकर' म्हणतात. जातकामगारांचा अंमल बहुधा सबंध जातीवर चालतो. कांहीं जातींत त्यांच्या अधिकारास स्थलसीमा घातलेली पाहण्यांत येते. कर्नाटकांतील 'काळकुणबी' जातींत 'गांव बुधवंत ' असून त्याचा वरिष्ठ 'महाल बुधवंत' आहे. पुण्याचे सुतारांना 'मेहतर ' व त्याचे वर ‘देश मेहतर ' आहे. न्हाव्यांमध्येही हे अधिकारी आहेत. आगरी लोकांच्या 'गांवपंचायती' असून ' तर्फपंचायती' ऊर्फ 'पेटापंचायती' आहेत. रत्नागिरीकडील चांभारांच्या जातपाटलाला 'महालकरी ' म्हणतात आणि त्याच्या वरिष्ठास ‘मामलेदार ' म्हणतात. विजापुराकडील महारांचा दर गांवीं 'नाईक' आहे. तेहतीस गांवांच्या नाईकांवर 'कसबेदार' नांवाचा अंमलदार आहे. कसबेदारांचे वरिष्ठाला 'कट्टीमनी' म्हणतात.