पान:गांव-गाडा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति      २७


विरुद्ध आचरण केलें, जातिसंप्रदायाविरुद्ध लग्न लावले, प्रेतसंस्काराच्या प्रसंगी मदत केली नाही, जमातीने मागितलेली वर्गणी दिली नाहीं, एखाद्या मानार्हाचा उपमर्द केला, तर जात त्याला शासन करते व पावनहीं करते. जेथे एका जातींतील एक अगर अनेक व्यक्तींचा किंवा सबंध जातीचा संबंध दुसऱ्या एक किंवा अनेक जातींशी किंवा सबंध समाजाशी अथवा राजाशी पडे तेथें जातींतील विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा सबंध जातीबद्दल जबाबदारी अवघ्या जातीवर टाकीत, आणि जातगंगा ती पार पाडी. तथापि जेव्हा एखादा इसम माजून जातीला मोजीनासा होई, तेव्हां धर्माध्यक्षाकडे अगर राजाकडे धाव घेऊन त्यांचे मार्फत जात आपल्या कायद्याची अंमलबजावणी करून घेई. धर्माध्यक्षाची आज्ञा जी जात किंवा जातींतील व्यक्ति उल्लंघी, तिचे पारिपत्य धर्माध्यक्ष राजाकडून करवीत. सारांश, ज्याप्रमाणे गांवकऱ्यांच्या बहुतेक सर्व राजकीय, धार्मिक व सामाजिक कृत्यांची जोखीम गांवगाडा उचली, त्याचप्रमाणे जातभाईच्या कृत्यांचा जिम्मा जात घेई; आणि लोकांवर राजा व धर्माध्यक्ष ह्या दोघांपेक्षाही खराखुरा अंमल जातीचा व गांवाचा असे. ह्यामुळे प्रस्तुत काळी ज्या अनेक गोष्टी खास राजसत्तेच्या म्हणून कायद्याने ठरविल्या आहेत, त्यांचा निकाल जात व गांव पूर्वी आपल्या अधिकारांत करी. मागून चालत आलेल्या वळणावर लोक अजूनही त्या करावयास जातात, पण नकळत त्यांजकड़न कायदा-केव्हां केव्हां तर फौजदारी कायदा-मोडला जातो. पट्टी वसूल करण्याच्या कामी स्वराज्याप्रमाणे पाटील कुलकर्णी नाठाळ कुळाच्या चुलींत क्वचित् प्रसंगी पाणी ओततात, किंवा त्याला अगर त्याच्या माणसांला विहीर बंद करतात. त्यांचे हे कृत्य गांवाला पसंत असते. पण कुळाने फिर्याद केली तर कायद्याप्रमाणे पाटीलकुळकर्ण्यांना शिक्षा करणे आधिकाऱ्यांना भाग पडते. हिंदुस्थानांतील ख्रिस्ती लोकांच्या लग्नासंबंधाने १८७२ चा १५वा कायदा आहे. त्याचे ६८ वे कलम असें आहे की, ह्या कायद्याप्रमाणे लग्न लावण्याचा अधिकार नाही अशा इसमानें डिस्ट्रिक्ट मॅरेज रजि-