पान:गांव-गाडा.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६      गांव-गाडा.


धंद्यांची वाटणी झाली आणि एकीचा धंदा दुसरी सहसा करणार नाही असा आळा पडला, तरी सबंध जातीचा ओघळ होतां होईल तो जातीबाहेर जाऊं देऊं नये ही कल्पना बहुजनसमाजांत अत्यंत दृढमूल झाल्याने प्रत्येक जातीने, पोटजातीने किंवा पंथानें, कांहीं राजकीय, धार्मिक व सामाजिक अधिकार राजाला, धर्माधिकाऱ्यांना किंवा सर्वसामान्य समाजाला अर्पण न करता आपले हाती राखून ठेविले. त्यामुळे पुष्कळ बाबतींत जातीच्या लोकांचा राजा व धर्माचार्य जातच राहिली. लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच आपले राजे असतात, तरी पण धर्मसंस्कारांवरील अधिपत्य धर्मगुरूकडे असते असें बहुधा पाश्चात्य देशांत आढळून येते. ह्या नियमाला हिंदु समाजांत मात्र काही अपवाद नजरेस पडतात. अठरा वर्णाचे नामधारी गुरु जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मण, मराठे, सोडून प्रत्येक जातीला गुरु व भिक्षुक आहेत; व ते त्यांचे अनेक धर्मसंस्कार चालवितात. उदाहरणार्थ, मिरजगांव परगण्याच्या माळ्यांचे. 'माळगण' आडनांवाचे भिक्षुक आहेत; आराधी, भुत्ये ह्यांचा भोप्या (गुरु) 'कदम' ( मराठा ); ढोरांचा गुरु 'घोडके'; महारांचा मागता (भिक्षुक ) 'ढेगुजी मेघुजी'; मांगगारोड्यांचा ‘डक्कलवार'. लग्नापेक्षा मोठा संस्कार कोणता असावयाचा ? शास्त्रांनी त्याला धर्मसंस्कार ठरविला आहे. म्हणून वास्तविक लग्न धर्माचार्यांनी लावावयास पाहिजे.. परंतु फांसपारधी, कोल्हाटी, कुंचीवाले, वड्डर, गोंड वगैरे हिंदु जाती कोणत्याही धर्माचार्याकडून लग्न न लावितां जातपंचांकडून लावतात. जातीचे समायिक बोभाटे जातगंगेने किंवा दैवानें मिटवावेत, त्यांत जातिबाह्य व्यक्तीचे किंवा संस्थेचे बोट शिरूं देऊं नये; येवढेच नव्हे, तर ज्या भानगडी जातिविशिष्ट नसून निवळ व्यक्तिविषयक आहेत किंवा ज्यांचा संबंध इतर जातींशीही तितकाच पोंचून त्यांनाही ज्या सामान्य आहेत, त्या देखील जातीने मिटवाव्यात असा निर्णय हिंदु समाजाने ठरविला; आणि तो धर्माध्यक्षांनी व प्राचीन राजांनीही मान्य केला. एखाद्याने काही दुष्कर्म केलें, जमातीच्या आचाराविरुद्ध किंवा ठरावा-