पान:गांव-गाडा.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
गांव-गाडा.


बलुतदार, व आलुतें मिळते ते आलुतदार होत. बलुतें अर्थातच आलुत्यापेक्षा अधिक असते. कुणब्यांना ज्या बलुतदारांचा जितका उपयोग त्या मानाने त्यांची प्रतबंदी लागून त्यांचे तीन वर्ग झाले आहेत. अशा वर्गाला 'ओळ' किंवा 'कांस' म्हणतात. पहिल्या वर्गाला 'थोरली' दुसऱ्याला 'मधली' व तिसऱ्याला 'धाकटी' ओळ किंवा कास म्हणतात. कांस म्हणण्याचा प्रघात पडण्याचे कारण असे की, कुणबी हा गाय, व बलुतदार ही वासरे मानलीं आहेत: आणि ही वांसरें आपापल्या पाळीप्रमाणे कांसेला लागतात. कुणबिकीला सर्वात जास्ती ज्यांचा उपयोग ते बलुतें पहिल्याने कासेला लागतात. आणि यथेच्छ जोगवतात, म्हणजे सर्वांत अधिक बलुतें त्यांना मिळते. पहिली ओळ आंखडल्यावर दुसरी ओळ सुटणार, म्हणून तिला पहिलीपेक्षा कमी दूध पिण्याला ( बलुते ) मिळते. तिसऱ्या ओळीची पाळी शेवटी येते. सबब तिचा वाटा सर्वात कमी असतो. गाय, तिची कांस, वासरे हें रूपक आणि कुणब्याचे बहुमानाचें नांव "बळी" ह्यावरून तर्क चालविला तर बलुत्या म्हणजे बली-अपत्य अशी व्युत्पत्ती सिद्द होते. बळाने म्हणजे हक्काने ऐन जिनसी उत्पन्न मागणारा तो बलुत्या, आणि आलेला आगंतुक म्हणून लोभाखातर किंवा धर्म म्हणून पसा मागणारा तो आलुत्या असेंही या शब्दांचे मूळ असू शकेल. मोहबत या शब्दाच्या अर्थाने देशावर 'अलुलकी' हा शब्द वापरतात. जसें "त्याचा कांहीं हक्क नाही पण चार ताटे घेऊन जा म्हणून अलुलकीने बोलावले,” असें कुणबी बोलतात. बलुतदारांना आपापल्या ओळीचें बलुतं हक्काने मागतां येते, व मिळतंही. बलुतदारांप्रमाणे आलुतदारांच्या ओळी नाहीत. साधारणतः पाटील, कुळकर्णी सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव,कोळी, ह्यांना बारा कारू किंवा बलुतदार म्हणतात. तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी, गोंधळी,डौऱ्या, भाट, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाना, वाजंत्री, घडसी, कलावंत, तराल किंवा कोरबु, भोई,