पान:गांव-गाडा.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९४      गाव-गाडा.

क्षेत्रांत वाजवी नफ्याने चोख माल विकण्याची दुकाने घालवीत. मालाच्या जबरदस्त उठावामुळे त्यांना अतिशय नफा होऊन यात्रेकरूंशी खरा व्यापार केल्याचे पुण्य लाभेल, आणि लोभी व कपटी व्यापाऱ्यांवर चांगला दाब राहून पेठांचें गढूळ वळण निवळेल. जेथें जें कलाकुसरीचे सामान होतें तें सचोटीने व रास्त नफ्याने मिळण्याची दुकानें क्षेत्रांनिहाय मोठ्या प्रमाणावर निघाली पाहिजेत, व त्यांची माहिती यात्रेकरूंना स्टेशनांवर, धर्मशाळांत मिळेल अशी तजवीज झाली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की, अज्ञेय पुण्यापलीकडे यात्रांपासून कोणताही तादृश व्यावहारिक फायदा नसल्यामुळे त्या जितके थोडे व निवडक लोक करतील तितकें बरें, असा लौकिक समजुतींत पालट झाला पाहिजे. पुराणातल्या फलश्रुतीला किंवा हरदासी-भिक्षुकी अतिशयोक्तीला अक्षर खरं मानून साधारण स्थितींतल्या माणसांनी तीन तीनदां महायात्रा किंवा उठल्या बसल्या आळंदी-पंढरी इत्यादींच्या वाऱ्या करकरून काळाचा व पैशाचा अपव्यय आणि आयतखाऊंची चंगळ करणे आपल्या देशाच्या सध्यांच्या सांपत्तिक हलाकीत अत्यंत उधळेपणाचे आहे. भिक्षुकी व उडाणटप्पू धंद्यांतले लोक जितके कमी होऊन धनोत्पादक धंद्यांत जातील तितकें देशाला हितकर आहे. लोकांत ज्ञानप्रसार झाल्यावांचून ही बाब त्यांच्या खात्रीस येणार नाही. परंतु ती जितकी आणतां येईल तितकी आणण्याची खटपट अवश्य झटून व तांतडीने झाली पाहिजे. हिला उपक्रम सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांतून त्वरित करता येईल. अन्नसत्रांत जेवणाराला काशीस 'छत्रपति' म्हणतात. छत्रपति साधू याप्रमाणे जेवण बाहेर काढतात आणि रेलवेभाड्यासाठी भीक मागतात. त्यांनी निढळच्या घामानें पैसे मिळविले नसल्यामुळे लांचलुचपत देण्याला त्यांना खंती वाटत नाही. आणि जो धारा ते पाडतात तो इतरांनाही भोंवतो. म्हणून पहिल्यानें याचक यात्रेकरूंच्या व साधूंच्या वर्गात मोडणाऱ्यांना सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांमध्ये जी खुराकी मिळते ती बंद झाली पाहिजे. म्हणजे कसाला टिकणारे असेच यात्रेकरू निघतील; आणि सध्या थापाथुपीच्या जोरावर जें