पान:गांव-गाडा.pdf/308

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायात्रा.      २८५

दक्षिणा फुगतच चालली आहे!! घोड्याची शेप देखील ज्यांमध्ये दृष्टीस पडत नसे असे सत्स्फूर्तिदायक व मनःकमलोन्मीलन करणारे साधे प्रेमळ ऋषींचे आश्रम कोणीकडे आणि ज्यांमध्ये विलासी लवाजमा व ऐषआरामाचा दर्प कोंबला आहे अशा गयावळांच्या हवेल्या कोणीकडे ? शास्त्र ह्यांना दक्षिणा देण्याला सांगते ती ह्यांनी शाश्वत वेदविद्या पाळावी ह्मणून, का ओकारी येईपर्यंत नश्वर ऐश्वर्य उपभोगावे म्हणून ? ' घोडा आपल्या गुणावर दाणा वाढवून खातो' ही म्हण वतनदार उपाध्यांनी पार खोटी करून दाखविली आहे. निमी दक्षिणा निरक्षर शूद्रवृत्तीच्या दलालांनी घ्यावी हाच का आमचा उत्तमोत्तम आर्यधर्म ? क्षेत्रांच्या ठिकाणी क्षौर करा, श्राद्ध करा, वेणीदान द्या, वगैरे कर्मे करण्यास आमच्या आचार्यांनी आज्ञा केली. परंत ती ज्यांकडून करवावयाची त्यांनी किती विद्या संपादन करावी व विधिपूर्वक कर्म करण्यासाठी त्यांनी किती मोबदला घ्यावा ह्याला धरबंद घातला नाही. त्यामुळे हे वृत्तिवंत अनक्षर तोंड वाशीतच आहेत आणि लोक बडतच आहेत. ठाकरांसारख्या पहाडांत राहणाऱ्या अक्षरशून्य ज्ञातींत इतका विचार असावा की नवरीच्या बापानं दहा का बारा रुपायांपेक्षा जास्त पैसे घेतले तर त्याला जात शासन करते; आणि अठरा वर्णांचे साक्षर गुरु जे ब्राह्मण त्यांच्या जातींतल्या प्रयागवळांनी वेणादानाच्या वेळी, गयावळांनी पिंडदानाच्या वेळी, किंवा मथुरेस चोब्यांनी, दक्षिणेसाठी यात्रेकरूंना त्राहि भगवान् करून सोडावें व नियंत्रणासाठी प्रांतोप्रांती वर्षानुवर्ष संचार करणाऱ्या श्रीशंकराचार्यांनी हा बाजार बेलाशक उघड्या डोळ्यांनी चालू द्यावा, ह्यापेक्षा धर्मविडंबनेची व आंधळेपणाची निरुत्तर साक्ष दुसरी कोणती असू शकेल ? एकतर आचारकाडांतून ही कर्मे काढा, आणि ठेवणे असेल तर ह्या

-----

 श्री रामचंद्राच्या अश्वमेधांतील घोडा पाहून भगवान् वाल्मिकीच्या आश्रमातले विद्यार्थी गोंधळून जाऊन लवाला सांगतात-बटवः कुमार अश्वोऽश्व पशुसमाम्नाये कोऽपि भूतविशेषो जनपदेषु श्रुुयते। सोऽयमस्माभिरधुना स्वयं प्रत्यक्षीकृतः । उत्तररामचरितम् ।