पान:गांव-गाडा.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८४      गांव-गाडा.

भाव । पुजाऱ्याशी कैचा देव' ॥ ह्या साधुश्रेष्ठाच्या उक्तीला हरताळ कोण लावील ? यात्रेकरूचे कर्म यथासांग होते की नाही, व ते तसें न झाले तर त्यांत कांहीं दोष आहे की काय ? ह्याशी ह्या दोन पैसे कमविण्यासाठी निर्माण झालेल्या भिक्षुकी टोळ्यांना काय करावयाचें आहे ? कोणीकड़न तरी शिकार साधली म्हणजे त्यांचे काम झाले. तरी दक्षिणी ब्राह्मणांकरवी तीर्थविधि व्हावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यानीं खबरदारी घेऊन प्रयागासच दक्षिणी ब्राह्मणाच्या मार्फत बिऱ्हाड घ्यावें, म्हणजे पुढचे गोते टळतील. पैशासाठी उत्तर हिंदुस्थानी पंड्ये नाही नाही ते आचार फैलावीत आहेत, आणि अज्ञजनाची वंचना करीत आहेत. असें सांगतात की मारवाडी गुजराती लोक वेणीदान करीत नाहीत. परतु दाक्षिणात्यांत पहावे तो त्याचा भयंकर प्रसार झाला आहे. विधवा-केशवपनासंबंधानें खुद्द ब्राह्मणांत रण माजून राहिले आहे. परंतु तुमच्याकडून ब्राह्मणाचे आचार करवून तुमचा धार्मिक दर्जा वाढवितों, आणि ब्राह्मणी पुण्य मिळवून देतो; असें कुणब्याधुणब्यांना मधाचे बोट दाखवून हे वृकोदर त्यांच्यामध्ये विधवा-केशवपन भराभर पसरीत आहेत. ही एकच गोष्ट त्यांच्या भिक्षुकीचे व्यापारी स्वरूप दाखविण्यास पुरी आहे.

 तीर्थोपाध्याय हे वतनवृत्तीचें अति नासकें फळ होय. त्यांच्या सामान्य नीतिमत्तेचा विचार बाजूला ठेवला तरी त्यांच्या यात्रेकरूसंबंधाच्या व्यवहाराकडे कानाडोळा करता येत नाही. विमलाचरण आणि अगाध विद्वत्ता ह्यांना पावन क्षेत्रे आणि मनसोक्त प्राप्ति ह्यांपेक्षा अधिक काय पाहिजे? प्रयागवाळ, गंगापुत्र व गयावळ ह्यांकडे डोळे उघडून पहा म्हणजे वतनदारी आणि सद्गुण ह्यांमध्ये छत्तिसाचा आंकडा आहे अशाविषयीं देहांत उजेड पडल्यावांचून राहणार नाही. त्यांना पंड्या(पंडित),व महाराज म्हणतात; परंतु बहुतेक वेदशास्त्रशून्य असतात, ते इतके की त्यांना स्नानसंकल्प देखील शुद्ध सांगता येत नाही. इकडे विद्येच्या नावाने असली रड; तथापि हत्ती, घोडे, गाड्या, मोटार, चाकर, आडत्ये, वगैरेच्या खर्चासाठी