पान:गांव-गाडा.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६६      गांव-गाडा.

ल्यास वावगें नाही. लांकूड दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. लोखंड लांकडापेक्षां काम चांगलें देते. टाटांच्या कारखान्यांतून लोखंड मुबलक बाहेर पडूं लागलें तर शेतकामाकडे लांकडापेक्षा लोखंडाचा उपयोग अधिक होणार आहे, हे लक्षात आणून सुताराची ओळ बदलणे व्यवहार्य दिसते. महार जागले ह्यांच्या कामांत जी सरकारची व रयतेची सरकत आहे ती तुटली पाहिजे; आणि दुकानदारांनी दुकानामागें दोन चार आणे व कुणब्यांनी पट्टीत रुपयामागें पै दोन पै देऊन त्यांना रोख नेमणूक करून देण्याचे लोकलबोर्डमार्फत सरकाराकडे सोपवावें. त्याशिवाय त्यांची पीडा दूर होणार नाही. बलुतेंआलुते हे कारूनारूंचा मुशाहिरा होय. तो देशपरत्वें खाण्याच्या मुख्य धान्याच्या रूपाने द्यावयाचा असतो. दुसरें धान्य केल्यामुळे अगर इतर कारणामुळे जर मुख्य धान्य देणे शक्य नसेल, तर त्याचा मोबदला दुसऱ्या पिकानें किंवा रोकडीने भरून काढावयाचा असतो. हा मूळ कयास आतां राहिला नाही. त्यामळे कारूनारूंच्या मागणींत पहिल्याने मोहबत व भीक आणि पुढे अडवणुक शिरून ती विनाकारण फाजील फुगली आहे. त्यांना जमिनी नसल्या तरी ते बी-भरण घेतात, मुख्य आयाखेरीज शेतांत पिकेल त्याची वाणगी उपटतात व चोऱ्या करतात; आणि रयतवारी पद्धति, अधिकारविभागात्मक राज्यसुधारणा व व्यापारवृद्धि ह्यांमुळे त्यांची मामूल कामें सुटली किंवा हलकी झाली, तरी रयत-घेण्यांत ते यत्किंचित् मुजरा घालीत नाहीत. हा अन्याय-नव्हे-जुलूम आहे. आज कारूनारू कुणब्याजवळ शेतमाल मागतात, तेव्हां असें म्हणत नाहीत की 'इतके काम केले व त्याची मजुरी इतकी होते;' तर 'माझा प्रपंच एवढा मोठा आहे आणि एवढ्यांत माझें कसें भागावें !! जणों काय काम करो किंवा न करो व त्याची किंमत काही असो, कुणब्याने सर्वांचा प्रपंच चालविण्याचा वांटाच उचलला आहे . क्वचित् ठिकाणी मोठ्या जमीनदारांनी आपल्या गड्यांना सुतारकाम, लोहारकाम शिकविलें आहे; व तें त्यांना बलुत्यापेक्षां फार स्वस्तांत पडतें