पान:गांव-गाडा.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६४      गांव-गाडा.

आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. गोरक्षण अत्यंत उपयोगी आहे आणि तें फलप्रद मार्गानी झालेही पाहिजे. परंतु परस्पर गाईचा खर्च काढणाऱ्यांना तो तसा काढू देऊ नये, आणि परधर्मीयांशी ह्या कामी हिंदू-जैनांनी वितंडवाद घालू नये, व आपला पैसाही दवडू नये. संघटित प्रयत्नांनी हाच वायां जाणारा पैसा चांगली खिल्लारे तयार करवून जनावरांची पैदास व संख्या, आणि त्यांच्या द्वारें दुधातुपाचा पुरवठा सुधारण्यांत खर्च पडला तर खरें गोरक्षण होईल. जातां जातां भूतदयेचे एक दोन अपवादास्पद प्रकार सांगतो. गाईंना व कुत्र्यांना भाकरी चारण्याचा पुष्कळ लोकांचा परिपाठ आहे. मारवाडी गुजराती बहुधां रोज गाईकुत्र्यांना भाकरीचा तुकडा टाकतात. त्यामुळे मालकांना आंच लागत नाही, रोडकी जनावरें व मोकार मांजरें कुत्रीं गल्लोगल्ली मैला खातांना दृष्टीस पडतात, आणि जनावरांची अवलाद दिवसेंदिवस हलकी होत चाललेली आहे. गाढवेंही मोकार सुटत असल्याने हाच प्रकार दृष्टीस पडतो. अशा जनावरांचा व्हावा तितका उपयोग होत नाही, आणि 'एक धड ना भाराभर त्या चिंध्या' मात्र वाढतात. दारसुन्या कुत्र्यांमध्ये पिसाळलेल्यांची संख्या वाढून अतिच त्रास होतो, आणि असा काळ आला आहे की, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्ध्याकोर भाकरीने अगर उकिरडा घोळण्याने गाई, मांजर, कुत्री किंवा गाढवे ह्यांचे पोषण होते असे नाही; मात्र त्यांना वर्षानुवर्षे उपवासांत काढावी लागतात. तरी वाई येथील गोशाळेच्या धर्तीवर ह्या दानधर्माला व्यवस्थित स्वरूप दिले तर चांगली जनावरें पैदा होण्याला व पोसण्याला मदत पोचेल, आणि हालांत राहणाऱ्या मरतुकड्या जनावरांची संख्या कमी होईल. गाढवांप्रमाणे डुकरेंही मोकार असल्यामुळे पिकांची खराबी करतात. फांस-पारधी, व क्वचित् मुसलमान पांखरे धरून अहिंसाधर्माच्या अनुयायांकडून पैसे उकळतात. त्यांना हा रोजगार झाला आहे. प्रज्ञायुक्त धर्मकल्पनांचा प्रसार झाला तर असल्या अनाचारास खात्रीने चांगले वळण लागेल. मोकार पशुपक्ष्यांना अन्न