पान:गांव-गाडा.pdf/284

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २६३

जनावरें पाहिजेत हे खरे; पण खाल्लेलें जिरविण्यास प्रमाणशीर काम मुळींच नसल्यामुळे त्या कामालाही ही मस्त जनावरें थोडक्या अवधीत निरुपयोगी होतात, आणि मरेपर्यंत त्यांचा धिंगाणा मात्र सोसावा लागतो; असा खडतर अनुभव येतो. दुभत्या गाईम्हशींना माफक काम दिलें तर त्या दुधाला चढतात, असा पाश्चात्यांचा अनुभव आहे. सरकार ज्याप्रमाणे वळू घोडे किंवा पोळ ठेवून कोणाला उपद्रव न होता त्यांजकडून काम घेते, त्याप्रमाणेच आपण केले पाहिजे. राखण-खावटीचा अंदाज करून एखाद्याने पोळ ठेवावा, आणि माफक फळणावळ घेऊन तिच्यांतून त्याचा खर्च काढावा. तेव्हां 'धर्मावर सोमवार' म्हणून देवांच्या नांवानें जनावरे सोडण्याच्या विरुद्ध व अशा जनावरांकडून आवश्यक तितकें काम घेण्याला अनुकूल असें लोकमत जागृत झाले पाहिजे, म्हणजे ती किफायतशीर रीतीने बाळगण्यास लोक तयार होतील व त्यांची तोषीस सबंध गांवाला लागणार नाही. जणों काय गांवावर पोळ सुटला, हा भाषणसंप्रदाय आतां बंद झाला पाहिजे. जसा देवाला वाहिलेल्या माणसांचा अधर्म पाहून वीट येतो तसाच देवांच्या नांवाने सोडलेल्या जनावरांची स्थिति व उपद्रव पाहून येतो. गाईला लोक पूज्य मानतात आणि तिने कशांतही तोंड घातलें तरी तिला कोणी मारीत नाही. ह्या धर्मसमजुतीचा फायदा घेऊन सर्व जातींचे लोक गाईना शेतांत व दाणाचाऱ्याच्या बाजारांत मोकार सोडतात. आणि त्या तेथें जोगावतात. कसायाच्या हातून गाई सोडविणे पुण्य आहे. ह्या धर्मसमजुतीचा फायदा घेऊन वऊन पुष्कळ ढोंगी लोक धर्मशील हिंदू-जैनांकडून पैसे उपटतात. त्यांना हा एक रोजगार झाला आहे. हे खरें गोरक्षण आहे काय, ह्याचा शांत मनानें विचार करावा. ज्याला ऐपत नाही त्याने लोकांच्या जिवावर गाई का बाळगाव्यात,आणि असले धंदेवाले आज पैसे घेऊन उद्या पुन्हा कसाबाला जनावर विकणार नाहीत कशावरून? त्यांना बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन त्यांच्या लुच्चेगिरीस उत्तेजन देण्यांत काय पुण्य आहे ? जोपर्यंत लोक गोमांस भक्षितात तोपर्यंत गोरक्षणाचे असले प्रयत्न करणे म्हणजे