पान:गांव-गाडा.pdf/278

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २५७

कडे न पाहतां करता येण्यासारख्या आहेत. आपापल्या जातीचे प्रत्यवाय,धर्मभोळेपणा व सांपत्तिक स्थिति त्यांना लवकर उमजेल, आणि त्यांत सारासार करण्याला कोठे जागा आहे हेही त्यांना अल्पायासाने ठरवितां येईल. तेव्हां जातिसंस्थांचा असा उपयोग करून घेतला तर जातिधर्म व त्याचा परिवार वतन ह्यांना हटविण्याचा पुढील मार्ग पुष्कळ सोपा होईल. जात आणि गांव हे भूलोकचे तुटक भाग राहिले नसून त्यांचा सर्वांग संबंध सबंध दुनयेशी आला आहे, आणि वैश्ययुगाला केव्हांच आरंभ झाला आहे. ह्या युगाची संक्रांत हरिणवेगानें मोघम व उधारी वतनाकडून 'रोख भाई ठोक' वेतनाकडे दौडत आहे. वतनांची व धंद्यांची गल्लत मुसलमानी अंमलांत थोडी झाली, पण ती तत्त्वतः न होतां घरांत वतन येते किंवा घरांतून वतन जातें, ह्या स्वार्थी दृष्टीने झाली. जातधंदे व वतनदारी ह्या दोन्ही संस्था समाजाला कूपमंडुक बनवितात आणि त्यांतील व्यक्तींचें पौरुष व दळणवळण कमी करून त्याची वाढ खुंटवितात, हे मुसलमान राज्यकर्त्यांनी ओळखलेंसें दिसत नाही. सदर राज्यांत पूर्वीची वतनें राहिली इतकेच नव्हे तर त्यांमध्ये महमदीयांच्या धार्मिक व सामाजिक समजुतीनी मुलाना, हिजडे, मुंढे वगैरेसारख्या वतनांची आणखी भर घातली. सुधारणेचा ओघ मुग्ध जात-धंद्याकडून खडखडीत करारमदाराकडे धोधो वाहत आहे, हे महातत्त्व इंग्रजांच्या मनांत पूर्णपणे बिंबलें आहे, आणि त्यांच्या नेहमीच्या सावधपणाने त्यांनी धंद्यांची गल्लत आरंभून धिम्मेपणाने चालविली आहे. समाजाची अनुकूलता असती तर हे काम बरेंच तडीस गेले असते. तेव्हां जातधंदे ऊर्फ जातिधर्म व वतन ह्यांचे दोष ज्यांना समजले असतील त्यांनी आपल्या देशबांधवांची समजूत घालून सरकार करीत असलेल्या गल्लतीस विरोध करू नये. ह्या सामाजिक संस्था जगाच्या आरंभापासून अखेरपर्यंत जशाच्या तशा कशा राहतील! त्या कांही सनातन मोक्षधर्म नव्हत. देशकालानुरूप त्यांत बदल नको का व्हावयाला ? सडली, भाकरी कां करपली आणि घोडा कां आडला ह्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर एक आह. फिरविणे झाले नाही म्हणून. समाजालाही हाच नियम लागतो.

----------